
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खतांच्या विक्रीत अनियमितता केल्याप्रकरणी सातारा कृषी विभागाने ८ विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले आहेत. तसेच, शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने तक्रार नोंदवण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर केले आहेत.
स्थैर्य, सातारा, दि. १७ एप्रिल : सन २०२६-२०२७ च्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर युरिया व इतर खतांच्या विक्रीत अनियमितता केल्याचे निदर्शनास आल्याने सातारा कृषी विभागाने धडक कारवाई केली आहे. खतांची विक्री करताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जिल्ह्यातील ८ कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे परवाने जिल्हास्तरीय भरारी पथकांमार्फत निलंबित करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली.
तपासणीत ‘या’ गंभीर त्रुटी आढळल्या
शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये आणि त्यांना खते व बियाणे योग्य किमतीत मिळावीत, यासाठी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच खते, बियाणे व कीटकनाशक विक्री दुकानांची तपासणी करण्याची विशेष मोहीम कृषी विभागाने हाती घेतली आहे. यासाठी जिल्हा व तालुकास्तरीय भरारी पथके तयार करण्यात आली आहेत.
या पथकांच्या तपासणीमध्ये काही विक्रेत्यांकडून खालील अनियमितता उघडकीस आल्या:
-
युरिया खताची विक्री करताना ‘पॉस’ (POS) मशीनचा वापर न करणे.
-
पॉस मशीनवरील साठा, प्रत्यक्ष साठा आणि नोंदवहीतील साठा यात मोठी तफावत असणे (साठा न जुळणे).
-
शेतकऱ्यांना खरेदीची योग्य आणि पक्की बिले न देणे.
या गंभीर बाबी उघडकीस आल्यामुळे, एप्रिल महिन्यात तपासणीत दोषी आढळलेल्या ८ खत विक्री केंद्रांवर थेट परवाना निलंबनाची कडक कारवाई करण्यात आली आहे.
काळाबाजार करणाऱ्यांना प्रशासनाचा इशारा
तत्पूर्वी, सर्व होलसेल खत विक्रेत्यांची एक आढावा सभा घेण्यात आली होती. खरीप हंगामाकरिता जिल्ह्यात पुरेसा खतसाठा उपलब्ध असल्याचे सांगून, खत वितरणाबाबत कोणत्याही प्रकारचा काळाबाजार करू नये, अन्यथा सक्त कारवाई करण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाने दिल्या होत्या.
सध्या सातारा जिल्ह्यातील २२ बियाणे उत्पादक कंपन्यांच्या तपासण्या पूर्ण झाल्या असून खत उत्पादक कंपन्यांच्या हंगामपूर्व तपासण्या युद्धपातळीवर सुरू आहेत.
तक्रार असल्यास ‘येथे’ करा संपर्क; व्हॉट्सॲप नंबर जाहीर
कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, बियाणे, खते व औषधे खरेदी करताना नामांकित कंपनीचाच आग्रह धरावा आणि विक्रेत्याकडून पक्के बिल आवर्जून घ्यावे, जेणेकरून फसवणूक होणार नाही. निविष्ठा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना योग्य सेवा न दिल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
तक्रार निवारण कक्ष :
पंचायत समिती स्तरावर व तालुका कृषी अधिकारी कार्यालयात निविष्ठांबाबत तक्रार असल्यास, ती नोंदवण्यासाठी ‘तक्रार नोंदवही’ ठेवण्यात आली आहे. तसेच, राज्यांच्या कृषिमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार शेतकऱ्यांना आपली तक्रार थेट मोबाईल व्हॉट्सॲपवर नोंदवता येणार आहे. यासाठी ९८२२६६४४५५ (9822664455) आणि ७४९८९२१२८४ (7498921284) या व्हॉट्सॲप क्रमांकांवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

