
थेट WhatsApp वर मिळवा
सासकल येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत कृषी विभागातर्फे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दीप प्रज्वलित करण्यात आला असून, महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
स्थैर्य, फलटण, दि. १२ ऑक्टोबर : फलटण तालुक्यातील सासकल येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत कृषी विभागामार्फत विविध योजनांच्या प्रचार व प्रसाराचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर घटस्थापनेच्या मुहूर्तावर शासनाच्या कल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्यात आला.
योजनांचा प्रचार व प्रसार
शासन आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या अभियानांतर्गत सासकल गावातील सुवर्णा मुळीक व सुरेश चांगण यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देण्यात आल्याने त्यांच्या घरी दीप प्रज्वलित करण्यात आला. तसेच पर्यावरणप्रेमी अमोल मुळीक यांच्या हस्ते महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती व नियोजन
या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन सहायक कृषी अधिकारी सचिन जाधव यांनी केले. यावेळी शेतकरी दत्तात्रय मुळीक, सासकल ग्रामविकास फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत मुळीक यांच्यासह विविध योजनांचा लाभ घेतलेले शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.





