
स्थैर्य, फलटण, दि. २ नोव्हेंबर : संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त, पंढरपूर ते घुमान (पंजाब) या ५००० किलोमीटरच्या पादुका पालखी रथ सोहळ्याचे व सायकल वारीचे आज, रविवारी (दि. २) सायंकाळी फलटण शहरात आगमन होत आहे. सायंकाळी ५:३० वाजता क्रांतीसिंह नाना पाटील चौक येथे या वारीचे स्वागत करण्यात येणार आहे.
संत नामदेव महाराज जयंतीचे औचित्य साधून हा सोहळा पंढरपूर येथून आजच सुरू झाला आहे. या वारीत ५००० किमीचा रथ सोहळा आणि १५० सायकलस्वार (ज्यात डॉक्टर, वकील व अधिकारी सहभागी आहेत) सहभागी झाले आहेत. क्रांतीसिंह नाना पाटील चौकात स्वागत झाल्यानंतर, सोहळा शिंपी समाज विठ्ठल मंदिराकडे जाईल.
फलटण शहर व तालुक्यातील सर्व राजकीय, सामाजिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार यांनी चरण पादुकांचे दर्शन घेण्यासाठी व स्वागतासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार सुभाष भांबुरे यांनी केले आहे.

