दैनिक स्थैर्य | दि. 19 एप्रिल 2023 | फलटण | मागील बऱ्याच वर्षांपासून आपण फलटणमध्ये शिवजयंती साजरी करत आहोत. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा तालुक्याच्या परंपरेला साजेशी अशी भव्य – दिव्य शिवजयंती साजरी करणार आहोत, असे मत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
फलटण येथे आयोजित बैठकीमध्ये श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नितीन भोसले, सुनील मठपती, पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे यांच्यासह तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित होते.
फलटण तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य – दिव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यामध्ये डीजे पथक, सनई चौघडा, संभळ पथक, लाइटिंग शो, लेझीम पथक, झांझ पथक, हलगी वादक, केरळी वादक, बॅण्ड पथक, तुतारी वादक, घोडे स्वार, उंट स्वार, प्रभू हनुमानाचा सजीव देखावा असणार आहे. यासोबतच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज व श्रीमंत छत्रपती सईबाई राणीसाहेब महाराज यांचे भव्य दिव्य असे देखावे उभारणार आहेत, असेही यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
मुधोजी क्लब – महात्मा फुले चौक – जैन मंदिर – मारवाड पेठ – शुक्रवार पेठ – शंकर मार्केट – श्रीराम मंदिर – गजानन चौक – उमाजी नाईक चौक – महावीर स्तंभ या मार्गे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शॉपिंग सेंटर, मोती चौक, फलटण येथे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सांगता करून श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती संपन्न होणार आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढणार असल्याने यामध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचीच गाणी लावण्यात येतील; अन्य कोणत्याही प्रकारची गाणी यावेळी लावण्यात येणार नाहीत, असेही यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शॉपिंग सेंटर, मोती चौक, फलटण येथे शुक्रवार दि. २१ रोजी रात्री ८ वाजता शिवव्याख्याते नितीन बानगुडे – पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून त्यानंतर रात्री ठीक ११ वाजता श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात येणार आहे, असेही यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.