
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक समता व मानवी हक्कांच्या चळवळीत समता सैनिक दलाचे योगदान ऐतिहासिक असल्याचे दादासाहेब भोसले यांनी विडणी येथे सांगितले.
स्थैर्य, फलटण, दि. 25 ऑगस्ट : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेल्या सामाजिक समता आणि मानवी हक्कांच्या चळवळीत समता सैनिक दलाचे योगदान ऐतिहासिक आहे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्याचे संघटक, समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर तथा पुणे व सातारा जिल्हा प्रभारी दादासाहेब भोसले यांनी केले. समता नगर (विडणी) येथे आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेतील चौथ्या पुष्पात ते बोलत होते.
आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीचा आढावा
भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या माजी पदाधिकाऱ्यांच्या वतीने या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि धम्मकार्याचा आढावा घेताना भोसले यांनी ब्रिटिश राजवटीतील गुलामगिरीबरोबर भारतीय समाजातील जातीय विषमता आणि अस्पृश्यतेच्या सामाजिक गुलामगिरीवर भाष्य केले.
सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी शाहू महाराज यांनी डॉ. आंबेडकरांच्या शिक्षण व सामाजिक कार्याला दिलेल्या योगदानाचा उल्लेख त्यांनी केला. माणगाव परिषदेत शाहू महाराजांनी डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाबाबत व्यक्त केलेल्या दूरदृष्टीवरही त्यांनी प्रकाश टाकला.
समता सैनिक दलाच्या भूमिकेवर भाष्य
२० मार्च १९२७ रोजी झालेला महाडचा चवदार तळे सत्याग्रह हा मानवी प्रतिष्ठा, स्वाभिमान आणि समानतेच्या अधिकारासाठीचा ऐतिहासिक संघर्ष होता, असे भोसले म्हणाले. काळाराम मंदिर सत्याग्रहाचाही त्यांनी उल्लेख केला.
महाड सत्याग्रहापासून डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणापर्यंत समता सैनिक दलाने संरक्षण, शिस्त आणि संघटनात्मक पातळीवर बजावलेल्या भूमिकेची माहिती त्यांनी दिली. महार रेजिमेंटच्या शौर्य, पराक्रम आणि देशसेवेच्या इतिहासावरही त्यांनी भाष्य केले.
२०२७ च्या शताब्दी वर्षासाठी आवाहन
भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून मीराताई आंबेडकर तसेच समता सैनिक दलाचे प्रमुख व भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धम्मप्रचार आणि प्रसाराच्या कार्याची माहिती भोसले यांनी दिली.
‘BSI Mission 25’ अंतर्गत धम्मशिक्षण, धम्मप्रशिक्षण, बौद्धाचार्य व धम्मप्रचारक घडविणे, संघटन विस्तार आणि समाजातील विविध घटकांपर्यंत बुद्ध-धम्माचा संदेश पोहोचविण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांचा त्यांनी आढावा घेतला.
समता सैनिक दलाच्या शताब्दी वर्षानिमित्त २० मार्च २०२७ रोजी महाड येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रत्येक जिल्हा व तालुक्यातून हजारो समता सैनिकांनी सहभागी व्हावे, यासाठी गाव आणि तालुका पातळीवर प्रशिक्षण शिबिरे घेऊन संघटन मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
‘धम्म जीवनात उतरविणे आवश्यक’
भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुक्याचे माजी सरचिटणीस बाबासाहेब जगताप यांनी सध्याच्या सामाजिक परिस्थितीत धम्माचे आचरण आणि मुलांवर धम्मसंस्कार करण्याची गरज व्यक्त केली. पालकांनी मुलांना बुद्ध-धम्माचे विचार, विवेक, नैतिकता आणि समतेची शिकवण द्यावी, असे त्यांनी सांगितले.
‘आचरणो परमो धम्मो’ या विचारानुसार धम्म प्रत्यक्ष जीवनात उतरविणे आवश्यक असल्याचे जगताप यांनी नमूद केले.
उपासक-उपासिकांची उपस्थिती
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुक्याचे माजी प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष रामचंद्र मोरे यांनी केले. यावेळी अनया अतुल मोरे आणि प्रतीक्षा शिवाजी झोडगे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, माजी सरचिटणीस बाबासाहेब जगताप, माजी प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष रामचंद्र मोरे, माजी संघटक तथा प्रमुख मार्गदर्शक राजेंद्रकुमार गायकवाड यांच्यासह न्यू पंचशील तरुण मंडळाचे पदाधिकारी, बौद्ध उपासक-उपासिका आणि बालक-बालिका उपस्थित होते.
