फलटणमध्ये प्रथमच कॅन्सर रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया; शासकीय योजनेतून उपचार मोफत

फलटणमध्ये प्रथमच कॅन्सर रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शासकीय आरोग्य योजनेचा लाभ मिळाल्याने रुग्णाच्या शस्त्रक्रियेसह उपचारांचा खर्च पूर्णतः मोफत झाला.

स्थैर्य, फलटण, दि. 25 ऑगस्ट : फलटणमध्ये प्रथमच कॅन्सर रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. श्रीमंत महाराजा मालोजीराव सिल्व्हर ज्युबली हॉस्पिटल, फलटण आरोग्य मंडळ, लाईफ लाईन हॉस्पिटल आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रक्रिया पूर्ण झाल्याने रुग्णाला लाखो रुपयांचे उपचार मोफत मिळाल्याची माहिती देण्यात आली.

जिभेच्या कॅन्सरवर शस्त्रक्रिया

ठाकुरकी येथील एका महिलेला जिभेचा कॅन्सर असल्याचे निदान झाल्यानंतर ‘हेमिग्लॉसेक्टॉमी’ शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले. आवश्यक तपासण्या आणि उपचारांनंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली.

डॉ. संजय राऊत, डॉ. मेघना बर्वे, डॉ. सागर गांधी आणि डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार प्रक्रिया पार पडली. वेस्टर्न इंडिया कॅन्सर केअरचे डॉ. इंद्रजीत बी. यादव, डॉ. सानिका कुलकर्णी आणि डॉ. जॉर्जिना ढालवाले यांनी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेसाठी विवेक सपकाळ आणि लाईफ लाईन हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

शासकीय योजनेतून उपचारांचा खर्च

रुग्णाच्या उपचारासाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यासाठी आमोद रुपनवर आणि तुषार देशपांडे यांनी सहकार्य केले. त्यामुळे शस्त्रक्रिया आणि उपचारांचा लाखो रुपयांचा खर्च योजनेच्या माध्यमातून पूर्णतः मोफत झाल्याचे सांगण्यात आले.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुख राहुल गावडे यांनी रुग्णाला योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला. गरजू आणि पात्र रुग्णांनी केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय मदत कक्षाने केले आहे.

गरजू रुग्णांसाठी वैद्यकीय मदत कक्ष

फलटण तालुक्यातील गरजू रुग्णांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या सहकार्य व मार्गदर्शनातून फलटणमध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे आणि पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख अनिल मोरे यांच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील गरजू रुग्णांना उपचार, मार्गदर्शन आणि शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी काम सुरू ठेवणार असल्याचे वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

Back to top button
Don`t copy text!