आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते सदाशिव जाधव कालवश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ जुलै २०२२ । मुंबई । आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, चिपळून तालुका हितसंवर्धक समितीचे संस्थापक सदस्य, विभाग क्रमांक ७ चिवेली विभागाचे आदर्श नेते, प्रज्ञा विकास संघटना मु. गाव गोंधळे ता. चिपळूण जिल्हा रत्नागिरी या संस्थेचे आधारस्तंभ, शाखा क्र ६ गोंधळे याचे माजी अध्यक्ष आदरणीय सदाशिव गेनु जाधव यांचे नुकतेच वयाच्या ८५ व्या वर्षी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.

दिवंगत जाधव यांच्या अंत्ययात्रेत चिपळूण तालुका हितवर्धक समितीचे विठोबा पवार, रामदासजी गमरे, प्राध्यापक विजय मोहिते त्याचबरोबर विविध क्षेत्रातील, संघटनेतील कार्यकर्ते, पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. झुंजार कर्तृत्व व आदर्श व्यक्तिमत्व असलेले सदाशिव जाधव अचानक निघून गेल्याने समाजातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या मागे सुना, पाच उच्चशिक्षित मुलं आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे ते मनमिळावू व सर्वसमावेशक स्वभावाचे व अत्यंत दिलदार व्यक्तिमत्व म्हणून तालुक्यात नावाजलेले होते, त्यांनी गेली चाळीस वर्ष रिपब्लिकन चळवळीत काम करून, रिपब्लिकन चळवळीच्या बापूसाहेब कांबळे यांच्यासोबत चळवळीच्या कार्यात पुढाकार घेऊन चळवळीचे फायनान्सर म्हणून त्यांनी आपली समाजिक जबाबदारी पार पाडली, त्यामुळे त्यांची वेगळी अशी छाप जनसामान्यात निर्माण झाली होती.

त्यांचा पुण्यानुमोदन व शोकसभा कार्यक्रम रविवार दिनांक ७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ठीक दहा वाजता रत्नबोधी बुद्धविहार, कन्नमवार नगर – २, विक्रोळी येथे शाखा क्रमांक ६, गोंधळे यांच्या अधिपत्याखाली आयोजित करण्यात आला आहे, तरी सर्व कार्यकर्त्यांनी सदर ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या आदर्शाला श्रद्धांजली अर्पण करावी अशी विनंती शाखा क्रमांक ६ गोंधळे या शाखेच्या सरचिटणीसांनी शाखेद्वारे काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!