
थेट WhatsApp वर मिळवा
राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषात सुधारणा करण्यात आली असून, नोव्हेंबर महिन्यापासून नवीन नियमांनुसार दरमहा भत्ता दिला जाणार आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २६ नोव्हेंबर : अंगणवाडीतील बालकांचे पोषण, आरोग्य आणि शिक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कामगिरीवर आधारित प्रोत्साहन भत्ता योजनेच्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेतला आहे. या नवीन सुधारित निकषांनुसार पात्र ठरणार्या अंगणवाडी सेविकांना दरमहा दोन हजार रुपयांपर्यंत, तर मदतनीसांना एक हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन भत्ता दिला जाणार असून, याची अंमलबजावणी नोव्हेंबर महिन्यापासूनच सुरू करण्यात आली आहे.
निकष पूर्ततेनुसार मिळणार दरमहा भत्ता
राज्यात एकूण १ लाख १० हजार ६६४ अंगणवाड्या कार्यरत असून, त्यामध्ये १ लाख ८ हजार ६२७ अंगणवाडी सेविका आणि १ लाख ५ हजार ४७० मदतनीस सेवा देत आहेत. अधिकाधिक सेविका व मदतनीस या योजनेसाठी पात्र ठराव्यात, यासाठी निकषांमध्ये सुसूत्रता आणण्यात आली आहे. सुधारित नियमांनुसार, अंगणवाडी केंद्रांसाठी निर्धारित केलेल्या १० निकषांपैकी किमान ७ निकष पूर्ण करणाऱ्या सेविकांना १ हजार ४०० रुपये आणि मदतनीसांना ७०० रुपये प्रोत्साहन भत्ता मिळेल. तर सर्व १० निकष पूर्ण करणाऱ्या सेविकांना २ हजार रुपये आणि मदतनीसांना १ हजार रुपये भत्ता दिला जाईल.
पोषण ट्रॅकर ॲपद्वारे होणार कामकाजाची पडताळणी
अंगणवाडी केंद्रांच्या गुणात्मक मूल्यमापनात समुदाय आधारित कार्यक्रम, घरपोच पोषण आहार, बालकांचे पूर्वशालेय शिक्षण, गरम ताजा आहार, आरोग्य दिवस, सकाळचा नाश्ता, दैनंदिन कामकाज, बालकांचे वजन व उंचीची नोंद आणि गृहभेटी या बाबींचा समावेश आहे. या सर्व कामांची दरमहा पडताळणी पोषण ट्रॅकर ॲपवरील नोंदींच्या आधारे केली जाणार आहे. शहरी व अतिदुर्गम भागातील सेविका आणि मदतनीसांना या निर्णयामुळे मोठे प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास मंत्री तटकरे यांनी व्यक्त केला आहे.



