सचिन वझेंना क्राइम ब्रांचमधून काढणार, गृहमंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा


स्थैर्य, मुंबई, दि.१०: मनसुख हिरेन प्रकरणी आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्यांमध्ये गृहमंत्र्यांनी सचिन वझे यांना क्राइम ब्रांचमधून काढले जाणार असल्याची घोषणा केली. ते विधान परिषदेत बोलत होते. मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात विधिमंडळात भाजपने थेट एपीआय सचिन वझे यांचे नाव घेतले होते. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना गृहमंत्री म्हणाले, की सचिन वझे यांना बाजूला करावे अशी मागणी विरोधकांकडून झाली. त्या प्रकारचा निर्णय आम्ही घेतला. त्यांना क्राइम ब्रांचमधून बाहेर केले आहे. त्यांना इतर ठिकाणी पाठवले जाईल.

कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही -गृहमंत्री

पत्रकारांशी संवाद साधताना अनिल देशमुख म्हणाले, मनसुख हिरेन यांची बॉडी सापडली होती. त्याबाबतीत हत्येचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्या प्रकरणाचा संपूर्ण तपास एटीएसला दिलेला आहे. महाराष्ट्राची संस्था एटीएस प्रोफेशनली चौकशी करत आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आरोप केले. त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर द्यावे, त्याची रितसर चौकशी केली जाईल. जो कुणी दोषी आढळेल त्याच्यावर कायद्याने कठोर कारवाई करण्यात येईल. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही.

त्याबरोबरच मोहन डेलकर यांनी जी मुंबईत आत्महत्या केली होती, त्याबाबत पत्नी, मुलगा आणि मुलगी यांनी काल मुख्यमंत्री आणि माझी भेट घेतली. मोहन डेलकर यांचा मुलगा अभिनव डेलकरच्या तक्रारीनुसार मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनमध्ये प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच याबाबत रितसर चौकशी सुरू आहे.

परंतु, केवळ क्राइम ब्रांचमधून हटवून चालणार नाही तर वझे यांना निलंबित करा अशी मागणी भाजपने लावून धरली. दरम्यान, यासंदर्भात सचिन वझे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत.

एपीआय वझेच्या डोक्यावर राज्य सरकारचा हात -फडणवीस

सचिन वझे यांच्या विरोधात आमच्याकडे पुरावे आहेत. काल दिवसभर मागणी केली पण, वझे यांच्या डोक्यावर वरिष्ठ नेत्यांचे हात असल्याने त्यांच्यावर काल नाही तर आज कारवाई करण्यात आली. सरकारची काय मजबूरी होती. जोपर्यंत या संपूर्ण पुराव्यासंह वझे यांच्यावर कारवाई होत नाही, त्यांना अटक होत नाही. मनसुख हिरेन यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.

मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जबाबच वाचला तेव्हा…
देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा मुद्दा मंगळवारी उपस्थित केला. त्यांनी मंगळवारी मनसुख यांच्या पत्नीचा जबाब सभागृहात वाचला. “माझ्या पतीची चौकशी वझे यांनीच केली होती. हिरेन तीन दिवस वाझेंकडेच होते. एवढेच नव्हे तर हिरने यांची गाडीही चार महिने वझेंकडेची होती” असे हिरेन यांच्या पत्नी म्हणाल्या. “वझेंना 201 कलमाखाली अटक का झाली नाही? वझे यांना कोण वाचवत आहे?” असा सवाल यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

सभागृहात बोलताना फडणवीस म्हणाले, “मी जबाब वाचून दाखवतो. वरील एकंदर परिस्थितीवरुन, माझ्या पतीचा खून झाला असावा अशी माझी खात्री आहे. हा खून सचिन वाझेंनी केला असावा असा माझा संशय आहे. म्हणून सदर घटनेबाबत सखोल चौकशी व्हावी. यामध्ये अजून दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली म्हणजे 2017 चा एफआयआर आहे. यानुसार दोन लोकांनी 40 लाखांची खंडणी मागितल्याचा एफआयआर आहे. यात दोन लोकांनी अटकपूर्व जामीन घेतला. यातील एकाचे नाव धनंजय विठ्ठल गावडे तर दुसऱ्याचे नाव सचिन हिंदुराव वझे असे आहे.”


Back to top button
Don`t copy text!