
थेट WhatsApp वर मिळवा
एशियन गेम्स २०२६ मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने पटकावलेल्या सुवर्णपदकात मोलाचे योगदान देणाऱ्या कोळकी येथील खेळाडू ऋतुजा पिसाळचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले.
स्थैर्य, फलटण, दि. १३ : एशियन गेम्स २०२६ मध्ये तब्बल ४४ वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले आहे. या सुवर्णमयी यशात फलटण तालुक्यातील कोळकी येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू ऋतुजा पिसाळ हिने अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पिसाळ हिच्या निवासस्थानी भेट देऊन तिचे विशेष अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
माजी खासदारांकडून कौतुक अन् ग्रामस्थांचा उत्साह
भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत मिळवलेले हे यश संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद असून, त्यात फलटणच्या कन्येचा महत्त्वाचा वाटा असल्याने तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या प्रसंगी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ऋतुजाच्या मेहनतीचे व सातत्याचे कौतुक करत तिच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.
मान्यवरांची उपस्थिती
अभिनंदनाच्या या सोहळ्यास जिल्हा परिषद सदस्य विष्णुपंत लोखंडे, पंचायत समिती सभापती शिवांजली भोसले, भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, पंचायत समिती सदस्य विकास नाळे, युवा नेते संजय देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे उपस्थित होते.
याशिवाय यशवंत जाधव, रणजीत जाधव, वैभव जाधव, अमित माने, संजय अहिरे, किरण पखाले, लक्ष्मण सोनवलकर यांच्यासह कोळकी ग्रामस्थ व पिसाळ कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.





