
थेट WhatsApp वर मिळवा
रेल्वे भरती बोर्डाच्या वतीने स्टेशन मास्टर पदाच्या भरती प्रक्रियेत आणि परीक्षा पॅटर्नमध्ये मोठा बदल करण्यात आला असून, आता उमेदवारांना दोन टप्प्यांऐवजी केवळ एकाच मुख्य परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २१ ऑक्टोबर : भारतीय रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर पदावर करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (RRB) आगामी स्टेशन मास्टर भरती प्रक्रियेत मोठा बदल केला असून, परीक्षेचा अभ्यासक्रम आणि टप्प्यांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या नव्या बदलामुळे आता उमेदवारांची परीक्षा प्रक्रिया अधिक सुटसुटीत होणार आहे.
दोन टप्प्यांऐवजी आता सिंगल स्टेज परीक्षा
पूर्वी स्टेशन मास्टर पदाची भरती रेल्वेच्या एनटीपीसी (NTPC) पदवी स्तरावरील परीक्षेच्या माध्यमातून घेतली जात होती, ज्यामध्ये सीबीटी-१ आणि सीबीटी-२ अशा दोन टप्प्यांमधून जावे लागायचे. मात्र, नव्या नियमांनुसार ही भरती प्रक्रिया आता स्वतंत्रपणे राबवली जाणार असून, दोन टप्प्यांऐवजी केवळ एकच ‘सिंगल स्टेज’ कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) घेतली जाईल. ही परीक्षा एकूण १०० गुणांची असणार असून, त्यासाठी १२५ मिनिटांचा ऐवजी १२० मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे.
नवा अभ्यासक्रम आणि गुणांची विभागणी
रेल्वे बोर्डाने सुधारित केलेल्या पॅटर्ननुसार, परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत बेसिक सायन्स, गणित, डेटा एनालिसिस, लॉजिकल कॅपेबिलिटी आणि मेंटल रीजनिंग या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच उमेदवारांच्या बौद्धिक क्षमतेचे योग्य मूल्यमापन करण्यासाठी इंग्रजी रीडिंग कॉम्प्रिहेंशनचा नवीन समावेश करण्यात आला आहे. लेखी परीक्षेतील गुण आणि त्यानंतर होणारी संगणक आधारित चाचणी (CBAT) यांच्या आधारे अंतिम मेरीट लिस्ट तयार केली जाणार आहे.





