
दैनिक स्थैर्य | दि. ३१ जुलै २०२६ | फलटण |
श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रस्ता सुरक्षा अभियान’ उपक्रम गुरुवारी उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ. गायकवाड एन. एम., उपप्राचार्य घनवट पी. डी., कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या रेणुका राठोड (मोटार वाहन निरीक्षक, फलटण) उपस्थित होत्या.
रेणुका राठोड मनोगतात म्हणाल्या की, वेळ वाचवण्यासाठी माणसे वाहन वापरतात; परंतु वाचलेला वेळ पुन्हा वाहन चालवण्यात वाया घालवतात. तेव्हा वाहने माणसावर स्वार होतात. अफाट वेगाने वाहन चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे वाहनचालकाच्या शरीर, मनावर अनावश्यक ताण निर्माण होतो. त्यामुळे स्वत्व आणि स्वास्थ्य हिरावून घेणारा काही अनैसर्गिक वेग कमी करण्याबाबत प्रत्येकाने विचार करावा. जगामध्ये सगळ्यात जास्त रस्ते अपघात आपल्या भारतात होतात. याबद्दल तरुणाईने थोडीशी जागरूकता बाळगून वाहन चालवावे. खरंच वाहन चालवायची गरज आहे का? गरज असेल तरच आपण वाहन चालवावे. अपघाताच्या ठिकाणी जखमींना मदत करावी, हेल्मेटचे व सीटबेल्टचे महत्त्व, वाहन परवाना, नो पार्किंग, वाहनांचे स्पीड, ओव्हरटेक, युटर्नची पद्धत, सिग्नल, रेडियमची नियमावली, झेब्रा क्रॉसिंग, वाहन चालवताना मोबाईलचा वापर, कलम १८३- ते-१९० ची माहिती विद्यार्थ्यांना त्यांनी दिली.
प्रशालेचे उपप्राचार्य घनवट पी. डी. यांनी वेगाने वाहन चालवत असताना काळजी घ्या, वाहन असे चालवा की तुम्हाला त्या वेगांवर नियंत्रण मिळवता आले पाहिजे. वेगाने वाहन चालवण्यामुळे आपले मज्जातंतू निकामी होतात आणि आपल्याला कायमचे अपंगत्व येण्याची शक्यता असते. त्यामुळे वाहनाचा वेग आजच्या तरुणाईने मर्यादित ठेवावा, असे सांगितले.
कार्यक्रमासाठी प्रा. साळुंखे पी. व्ही., प्रा. मेटकरी, प्रा. तांबोळी ए. एस., प्रा. नाळे जे. ए., प्रा. वाघ जी. बी., सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.