स्थैर्य, ढेबेवाडी, दि.१२: बिबट्याच्या हल्ल्यात रानडुकराच्या पिल्लासह दोन कुत्र्यांचा मृत्यू झाला, तर शेळी गंभीर जखमी झाली. कुंभारगाव (ता. पाटण) जवळच्या कळंत्रेवाडी, शिबेवाडी येथे घडलेल्या या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुंभारगाव परिसरातील वाड्यावस्त्यात बिबट्याचा उपद्रव वाढला आहे. काही दिवसांपूर्वी तेथे झाडावर चढलेली बिबट्याची मादी आणि झाडाखाली थांबलेला तिचा बछडा बघायला गाव लोटला होता. गेल्या दोन दिवसांत त्या परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या तीन घटना घडल्या. तेथील कळंत्रेवाडी परिसरात रानडुकरांच्या कळपात घुसलेल्या बिबट्याने डुकराच्या पिलाला ठार केले. तानाजी कळंत्रे यांच्या ज्वारीच्या शिवारात हे मृत पिल्लू आढळून आले. दरम्यान, तेथीलच शिबेवाडीतील रमेश नारायण शिबे यांच्या घराजवळ आलेल्या बिबट्याने शेळीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला; परंतु आरडाओरडा ऐकून धावलेल्या ग्रामस्थांमुळे शेळीला तेथेच सोडून बिबट्या पसार झाला.
जखमी शेळीवर तळमावले येथे उपचार करण्यात आले. बिबट्याने त्या परिसरातील दोन मोकाट कुत्रीही फस्त केल्याचे नागरिकांनी सांगितले. सध्या डोंगरात वाढलेले गवत आणि शिवारातील उभी पिके यामुळे बिबट्याला लपण्यास जागा उपलब्ध होत असून, शेतकरी शिवारात एकटे जाण्यास घाबरत आहेत. वनपाल सुभाष राऊत, वनरक्षक एस. एस. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.