

स्थैर्य, सातारा, दि.१७ : रेवंडे (ता. सातारा ) घाटात आज पहाटे मोठ्या प्रमाणात दरड कोसळली. त्यात डांबरी रस्त्याची मोठी हानी झाली आहे. दरडीचा मोठा भाग रस्त्यावर येऊन कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.
साता-यातून बोगदामार्गे जाणारा रस्ता रेवंडे भागात जातो. अलिकडच्या काळात कोट्यवधी रुपयांच्या निधीतून इथे घाटरस्ता तयार करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतुकीची सुविधा प्राप्त झाली आहे. यंदा पश्चिम भागात झालेल्या संततधार पावसामुळे या परिसरात वारंवार दरड कोसळण्याचे प्रकार घडले होते. मात्र वेळीच उपाययोजना केल्यामुळे वाहतूक बंद होण्याचे प्रकार घडले नाहीत. मात्र आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास रेवंडेतून साता-याकडे जाणा-या मार्गावर असलेल्या सोनार खिंडीत मोठी दरड कोसळली. दरडीचे मोठमोठे दगड कोसळून रस्त्यावर आल्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला. त्यातून साता-याकडे होणारे दळणवळण ठप्प झालेे. पंतप्रधान सडक योजनेतून अलिकडच्या काळात नव्याने झालेल्या या घाटरस्त्यामुळे रेवंडेसह वावदरे, बेंडवाडी येथील ग्रामस्थांची सोय झाली आहे. घाट बंद झाल्यामुळे येथील लोकांना 12 किलोमीटरचा वळसा घालून राजापुरी, बोरणे या मार्गे ठोसेघर रस्त्याने साता-याला जावे लागणार आहे. रस्ता बंद झाल्यामुळे या सर्वांना आता विविध समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.

