छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी जीर्णोद्धारामुळे इतिहासाचे पुनरुज्जीवन : राजमाता कल्पनाराजे भोसले


 


स्थैर्य, सातारा, दि.१५ : संगममाहुली येथील कृष्णा- वेण्णा नद्यांच्या
संगमावरील छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या जीर्णोद्धारीत समाधीचे
राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते आज (मंगळवार) लोकार्पण करण्यात
आले. समाधी जीर्णोद्धारामुळे इतिहासाचे पुनरुज्जीवन झाल्याची प्रतिक्रिया
राजमाता कल्पनाराजेंनी दिली.

 

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न
त्यांचे नातू छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांनी पूर्ण केले.
स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांचे सातारा येथील
रंगमहालात 15 डिसेंबर 1749 रोजी निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर
संगममाहुली येथील राजघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले व त्याचठिकाणी समाधी
उभारण्यात आली होती. या समाधीचा जीर्णोद्धार लोकसहभागातून करण्याचा संकल्प
साताऱ्यातील इतिहासप्रेमींनी सोडला.

यानुसार या कामास ऑक्‍टोबर 2018 मध्ये सुरुवात झाली. मूळ समाधीस धक्का न
लावता, आहे त्याचठिकाणी ताशीव आणि घडीव दगडांच्या साहाय्याने सदर समाधीचे
काम हाती घेण्यात आले. सदर समाधीच्या काम पूर्ण झाल्यानंतर छत्रपती शाहू
महाराज (थोरले) यांच्या 270 व्या पुण्यतिथीदिवशी तिचे लोकार्पण करण्याचा
निर्णय घेण्यात आला. यानुसार आज संगममाहुली येथे जीर्णोद्धारीत समाधी
लोकार्पण सोहळा राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते पार पडला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!