दैनिक स्थैर्य | दि. २८ जानेवारी २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी महाविद्यालय फलटण येथे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (सेक्रेटरी, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण) यांच्या हस्ते व श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर (सदस्य, गव्हर्निंग कौन्सिल फ.ए. सोसायटी, फलटण) यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण करण्यात आले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार २६ जानेवारी १९५० पासून देशाचा कारभार सुरू झाला व हा दिवस सर्व भारतामध्ये प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
मुधोजी महाविद्यालयात श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पंढरीनाथ कदम यांनी भूषविले. यावेळी वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. संजय दीक्षित, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. संजय वेदपाठक उपस्थित होते.
ध्वजवंदनानंतर राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी लेफ्टनंट प्रा. संतोष धुमाळ, लेफ्टनंट प्रा. शिंदे लिना यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट संचलन सादर केले. यावेळी एनसीसीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कॅडेट्सचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय छात्रसेनेचे सर्व कॅडेट्स, राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व स्वयंसेवक, सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका, प्रशासकीय कर्मचारी, सेवक वर्ग व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.