प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २८ जानेवारी २०२४ | फलटण |
कोळकी सरस्वती शिक्षण संस्था संचलित, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलच्या बाल चिमुकल्यांनी व विद्यार्थ्यांनी स्वतंत्र सैनिक व महापुरूषाची भाषणं, समूह गायन नृत्य कला, मल्लखांब, लेझीम आणि पिरॅमिडच्या रचना सादर केल्या.

कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी डॉ. प्रसाद जोशी (प्रख्यात अर्थोपेडिक्स), श्री. उस्मान शेख (निवृत्त अभियंता), सब इन्स्पेक्टर श्री. शिवाजीराव काळे, श्री. अभयकुमार साबळे, लायन्स सौ. उज्ज्वला निंबाळकर, ला. सुनीता कदम, कोळकीच्या ग्रामपंचायत सदस्या सौ.रेश्मा देशमुख, श्री. पांडुरंग पवार, सौ. सुलोचना पवार, संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका संध्या गायकवाड, प्राचार्य श्री. अमित सस्ते, समन्वयिका सुवर्णा निकम व योगिता सस्ते उपस्थित होत्या.

प्रथम प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे डॉ. प्रसाद जोशी व इतर मान्यवर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. झेंड्याला मानवंदना देऊन राष्ट्रगीत व झेंडा गीत विद्यार्थ्यांनी गायले. त्यानंतर सामूहिक संविधान प्रस्ताविका वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचा उत्साह वाढवण्यासाठी देशभक्तीपर गीते, मल्लखांब, लेझीम तसेच प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादरीकरण केले व विविध प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. श्रीराम प्रतिष्ठापना अयोध्या सोहळ्यातील प्रसंगदेखील सादरीकरणात केला गेला. पूर्व प्राथमिकच्या बाल चिमुकल्यांनी देशप्रेमाबद्दल कविता सादर केली आणि विविध देशभक्तांचे पेहराव करून त्यांची घोषवाक्य व विचार मांडले. तसेच प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी ‘तिरंगा उंच उंच रहेगा’ समूहगीत सादर केले, भाषण केले, कवायती आणि नृत्यासोबत मल्लखांब व मार्शल आर्टची प्रात्यक्षिकांचे देखील सादरीकरण केले व सर्व पालक आणि मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानातील भारतातील प्रत्येक नागरिकाचे अधिकार, संविधानिक अधिकार व मौलिक कर्तव्ये यावर आधारित नाटिका सादरीकरण केले व समाजातील विविध गोष्टींवर प्रबोधनात्मक प्रसंग सादर केले. अतिशय सुरेल आवाजात माध्यमिकच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतांचे गायन केले व याच विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी अप्रतिम परेड (संचलन) केले. त्याचबरोबर चित्रकला व क्राफ्टचे प्रदर्शनाचे उद्घाटन सौ. रेश्मा देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू व चित्रकलेच्या प्रतिमा खूपच सुंदर होत्या. ते सर्वांसाठी खुले होते. यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून आला.

यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. प्रसाद जोशी आपल्या भाषणात बोलताना म्हणाले, देशाचा विकास हा नागरिकांच्या देशाविषयी असणार्‍या जबाबदारीवर आधारित आहे. तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईलचा जास्त प्रमाणात उपयोग करू नये. त्याचबरोबर सर्व पालकांना आरोग्य विषयी माहिती दिली. यावेळी अभयकुमार साबळे यांनीही विद्यार्थ्यांच्या कलांचे व गुणांचे कौतुक केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये अतिशय समर्पक शब्दांमध्ये श्री. उस्मान शेख यांनी विद्यार्थी व पालकांना वाचनाचे महत्त्व सांगितले व त्यांच्या जनसेवा वाचनालयामध्ये उपलब्ध असणार्‍या विविध पुस्तके व त्याबद्दलची माहिती सांगितली. विद्यार्थी व त्यांच्या उत्साहाचे कौतुक करत शिक्षकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या व संस्थेचे आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या शेवटी फलटण तालुक्यात सामाजिक कार्य करणार्‍या समाजातील विविध मान्यवरांचा सरस्वती शिक्षण संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. प्रसाद जोशी, श्री. शिवाजी काळे, सबइनस्पेक्टर श्री. अभयकुमार साबळे, सबइन्स्पेक्टर, श्री. लक्ष्मण लोहार माजी सुभेदार मिलिटरी, श्री. प्रशांत धनावडे कोळकी ग्रामपंचायत सदस्य माऊली फौंडेशन, श्री. रामचंद्र खिलारे माजी स्वातंत्र्यसैनिक, सौ.सुनीता नायर, सदस्या आर्ट ऑफ लिविंग इत्यादी मान्यवरांचा सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेच्या प्रांगणात सर्व विद्यार्थी व शिक्षक त्याचप्रमाणे पालकही बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रोहीनी ढालपे व सौ. सुषमा नाळे यांनी केले. आभार जागृती गुप्ता यांनी व्यक्त केले.

दरम्यान, अक्सा शेख या विद्यार्थिनीची थायलंड येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल तिचे विशेष अभिनंदन करण्यात आले व शौर्य किरण जाधव या विद्यार्थ्याची राज्यस्तरीय गोळाफेकसाठी निवड झाली, त्याचेही गिफ्ट देऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!