फलटण – पंढरपूर रेल्वे मार्गाचा अहवाल जुन्या सर्वेक्षणानुसार करा : खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर


स्थैर्य, फलटण दि.5: फलटण – पंढरपूर रेल्वे मार्गाबाबतच्या नवीन सर्वेक्षणाचा अनेक गावांना त्रास होत आहे. अनेकांच्या जमिनी, घरे जात असून व्यवसायिकदृष्ट्याही नुकसान होत आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गाचा संपूर्ण अहवाल जुन्या सर्वेक्षणानुसारच करा, असे आदेश माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा पुणे विभागीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अधिकार्‍यांना दिले.

फलटण – पंढरपूर रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाबाबत खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यामध्ये त्यांनी वरील आदेश दिले. बैठकीस विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा, अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक सारेश भाजपे, वरिष्ठ विभागीय ऑपरेशन मॅनेजर डॉ.स्वप्निल नीला, विभागीय कमर्शियल व्यवस्थापक श्याम कुलकर्णी, वरिष्ठ विभागीय अभियंता नजीब मुल्ला, कार्यकारी अभियंता श्री निवास यांची उपस्थिती होती.  गेल्या अनेक वर्षांपासून फलटण – पंढरपूर या रेल्वेमार्गाचा रेंगाळलेला प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर प्रयत्न करीत असून गेल्या दोन महिन्यांपूर्वी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना भेटून सर्वेक्षणाच्या संदर्भामध्ये मागणी केली होती. त्याप्रमाणे रेल्वेमंत्र्यांनी तात्काळ अहवाल मागितला असून त्या अनुषंगाने सदरच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान, बैठकीवेळी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण – बारामती रेल्वे मार्ग, नियोजित फलटण – पुणे रेल्वे सेवेचा शुभारंभ आणि हैद्राबाद – मुंबई बुलेट ट्रेन मार्ग याबाबतही अधिकार्‍यांशी सविस्तर चर्चा करुन त्यांना योग्य त्या सूचना दिल्या.


Back to top button
Don`t copy text!