स्थैर्य, फलटण, दि. २३ : नीरा उजवा कालव्यामधील वीर, तडवळी व फलटण या ठकाणी असणारे इरिगेशन बंगले (IB) हे नादुरुस्त आहेत त्यांची डागडुजी करणे आवश्यक आहे, हि बाब फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर नीरा उजवा कालव्यामधील इरिगेशन बंगल्याची (IB) दुरुस्ती करा व जेथे डागडुजी करण्याची आवश्यकता आहे तेथे सुद्धा तातडीने डागडुजी करा असे आदेश उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी समंधित अधिकाऱ्यांस दिले.
पुणे येथील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे नीरा उजवा कालवा, नीरा डावा कालवा, या कालव्यांच्या कालवा सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली होती. बैठकीत सोलापूरचे पालक मंत्री ना. दत्तामामा भरणे, आमदार रणजितसिंह मोहिते – पाटील, शहाजी पाटील, प्रशांत परिचारक, राम सातपुते, माजी आमदार दीपक साळुंखे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण उपस्थित होते.