दैनिक स्थैर्य | दि. ६ ऑगस्ट २०२३ | फलटण |
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस. टी.) हाच फलटण शहर व तालुक्यातील सर्वसामान्यांना प्रवासासाठी एकमेव सोयीचा, परवडणारा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा मार्ग असल्याने सर्वसामान्य प्रवासी कितीही गैरसोय झाली तरी एस. टी. पासून दूर जात नाही, जाणार नाही, ही वस्तुस्थिती आहे.
सर्वसामान्य प्रवाशांचे एस.टी.वर अतोनात प्रेम आहे. कितीही गैरसोय झाली, बसेस वेळेवर सुटल्या नाहीत, रस्त्यात बंद पडल्या, अस्वच्छ असल्या, पावसाळ्यात गळत असल्या तरीही सातारा विभागात फलटण एस. टी. आगाराचे उत्पन्न अधिक असते. याचे कारण इथल्या सर्वसामान्य प्रवासी वर्गाने एस. टी. वर जीवापाड प्रेम केले, आजही ते कायम आहे. पण, एस. टी. चे या प्रवाशांवर प्रेम, त्यांच्याविषयी आपुलकी आहे का? याचे उत्तर नेहमीच अनुत्तरीत राहिले आहे.
फलटण आगारात ये-जा करणार्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. फलटण आगारातून पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, पंढरपूर, नगर त्याचप्रमाणे शिंगणापूर, गोंदवले, पुसेगाव, तुळजापूर, गाणगापूर, अष्टविनायक, जोतिबा, नाशिक आदी तीर्थक्षेत्रांसह मोठ्या शहरांकडे जाणार्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. तसेच ग्रामीण भागातून फलटण शहरात येणारे विद्यार्थी, छोटे व्यापारी, शासकीय कामकाजासाठी येणारे किंवा न्यायालयीन कामकाजासाठी येणारे नागरिक, शेतकरी यांची संख्या मोठी आहे.
प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन फलटण आगाराला नवीन साध्या, निमआराम, आराम बसेसची गरज आहे.
सुमारे ४ ते ५ हजार विद्यार्थी/विद्यार्थिनी विविध शाळा-महाविद्यालयात शिक्षणासाठी दररोज फलटणला येत असतात. त्याशिवाय अलीकडे एस. टी. ने महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के व ज्येष्ठांना १०० टक्के सूट दिल्याने त्यांची संख्याही एस. टी. प्रवाशांमध्ये वाढत असल्याने या सर्व वाढत्या प्रवासी संख्येची नोंद घेऊन एस. टी. प्रशासनासह नेते मंडळींनी फलटण एस. टी. आगारातील सध्याच्या नादुरूस्त किंबहुना वापरायोग्य राहिल्या नसलेल्या एस. टी. बसेस काढून घेऊन साध्या (लाल) आणि निमआराम अशा दोन्ही मिळून पहिल्या टप्प्यात ५० आणि दुसर्या टप्प्यात ३० अशा एकूण किमान ८० बसेस तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.