सातारा शहरातील आणि तालुक्यातील कन्टेन्टमेन्ट झोन वगळून नॉन रेड झोन नुसार शिथिलता


स्थैर्य, सातारा दि. 22 : सातारा शहर आणि तालुक्यात जिथे बाधित रुग्ण आढळून आले ते सदरबझार, गार्डनसिटी, प्रतापगंज पेठ, कारागृह, गेंडामाळ, कोडोली (शिवाजीनगर) आणि ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून शासनाने निर्धारित केलेल्या नियमानुसार नॉन रेड झोन प्रमाणे शिथिलता देण्यात आली आहे. वरील प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रामध्ये जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशानुसार सातारा तालुक्यात  लॉकडाउनमध्ये उपविभागीय अधिकारी तथा इंन्सिडंट कमांडर, सातारा  मिनाज मुल्ला यांनी शिथिलता दिली आहे.

या शिथिलतेत सर्व व्यक्तींच्या हालचाली अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा या कारणाशिवाय सायंकाळी 7 ते सकाळी 7 या कालावधीत प्रतिबंधीत करण्यात येत आहे. वय वर्षे 65 वर्षावरील व्यक्ती, व्याधीयुक्त व्यक्ती, गर्भवती महिला, 10 वर्षाखालील मुले यांनी अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा वगळता घरामध्येच रहावे. त्यांना बाहेर पडण्यास प्रतिबंध राहील. सर्व शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इन्स्टिटयूट या बंद राहतील. हॉटेल, रेस्टॉरंट, स्पा. व इतर हॉस्पिटीलिटी सेवा बंद राहतील. फक्त या सेवा आरोग्य, पोलिस, शासकीय अधिकारी व कर्मचारी, आरोग्य विषयक काम करणारे कर्मचारी, लॉकडाऊनमुळे अडकलेले पर्यटक, कामगार व क्वारंटाईन सुविधा चालविणाऱ्या ठिकाणी यांच्यासाठी या सेवा चालू राहतील. तथापि रेस्टॉरंट यांना त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये पदार्थ तयार करुन घरपोच सेवा देता येतील. सर्व चित्रपट गृहे, शॉपिंग मॉल, जिम, स्विमींग पुल, एंटरटेंमेंट पार्क, बार्स ॲन्ड ऑडिटोरियम, असेंम्बली हॉल, मंगल कार्यालय हे सर्व बंद राहतील. सर्व सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे व मोठया संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम बंद राहतील. सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे बंद राहतील.

इतर सर्व दुकाने, शॉप, औद्योगिक व खाजगी आस्थापना चालू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. प्रतिबंधित नसलेल्या कृती करण्यास कोणत्याही परवानगीची गरज नाही. क्रीडांगण, स्टेडीयम व इतर सार्वजनिक खुल्या जागेमध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीशिवाय व समुह विरहीत, सामाजिक अंतर ठेवून शारिरिक व्यायाम व इतर क्रिया करण्यास परवानगी देण्यात येत आहे. सर्व वैयक्तिक व सार्वजनिक वाहतुकीस परवानगी राहील, यामध्ये दुचाकी वाहनावर 1 चालक, तीनचाकीवर 1+2 व्यक्ती, चार चाकी वाहनात 1+2 व्यक्ती.

सुरक्षित शारीरिक अंतर व सफाई व्यवस्थेची खबरदारी घेऊन, विहीत केलेल्या प्रवासी क्षमतेच्या 50%  क्षमतेने जिल्ह्यांतर्गत एस टी बस सेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. सर्व मार्केट व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 वा. या वेळेमध्ये चालू राहतील. जर गर्दी अथवा सामाजिक अंतराचे पालन न केल्यास तात्काळ बंद करण्यात येतील.

कोरोना प्रतिबंध उपाययोजना करणे सर्वांसाठी बंधनकारक राहील

सार्वजनिक  ठिकाणी, घराबाहेर व  घरामध्ये जेथे लोकांचा वावर आहे तेथे असताना चेहऱ्याचे तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर 500/- रु. दंड आकारण्यात येईल. सातारा जिल्ह्यातील कोणत्याही सार्वजनिक अथवा खाजगी जागेच्या ठिकाणी थुंकण्यास मनाई असून, थुंकल्यास 1000/- रु. दंड आकारण्यात येईल.जिल्ह्यात सार्वजनिक लोकांचा वावर असणाऱ्या खाजगी ठिकाणी तसेच वाहतुकीच्या साधनांमध्ये सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे.

अंत्यविधी व लग्न समारंभ या काय्रक्रमाध्ये 50 पर्यत व्यक्तींना सामाजिक अंतर ठेवून कार्यक्रम करण्यास परवानगी राहील. तथापि लोकांची गर्दी होऊ नये म्हणून संयोजकांनी काळजी घेणे गरजेचे राहील. सार्वजनिक ठिकाणी दारु, पान, तंबाखू इत्यादी सेवन करण्यास मनाई करण्यात येत आहे. दुकामानध्ये प्रत्येक ग्राहकात किमान 6 फुट अंतर राहील याची खात्री करावी तसेच दुकानामध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्तींना घेण्यास मनाई करण्यात येत आहे.  या आदेशाचे ग्रामीण भागात प्रथम उल्लंघन झाल्यास रु. 500/- दंड आकारण्यात येईल. ग्रामीण भागात दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास रु. 1000/- दंड आकारण्यात येईल. व ग्रामीण भागात तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करुन दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल.

या आदेशाचे शहरी भागात प्रथम उल्लंघन झाल्यास रु. 1000/-, दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास रु. 2000/-दंड आकारण्यात येईल व  शहरी भागात तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करुन  दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल. ग्रामीण व शहरी दोन्ही भागात या आदेशाची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थेने करावयाची आहे.

शक्य असेल त्या ठिकाणी घरातून काम करण्यास प्राधान्य देण्यात यावे. कामाच्या आणि व्यवसायाच्या वेळा या कार्यालयामध्ये, कामाच्या ठिकाणी मार्केटमध्ये, औद्योगिक तसेच व्यावसायिक आस्थापनेमध्ये गर्दी होणार नाही, अशा पध्दतीने विभागून द्याव्यात. थर्मल स्कॅनिग, हँडवॉश, सॅनिटायझर याची एन्ट्री पाँईट व एक्झिट पाँईंट वर व्यवस्था करावी.  कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक उपयोगाच्या जागा व सामान्य माणसाच्या वापरात येणाऱ्या सर्व जागा व वस्तू यांचे अधून मधून सॅनिटायझेशन करण्यात यावे. सर्व औद्योगिक व व्यावसायिक आस्थापना यांनी त्यांच्या कामगारांमध्ये कामाची वेळी,  कामाची पाळी बदलण्याची वेळी , जेवणाच्या व इतर सुट्टीचे वेळी , कामावर येताना व कामावरुन सुटताना सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक राहील.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!