साखरेच्या वाढलेल्या किमतीचा फायदा ऊस उत्पादकांनाही मिळाला पाहिजे; कारखान्यांनी प्रतिटन ३०० ते ५०० रुपयांपर्यंत अंतिम हप्ता द्यावा : माजी खासदार राजू शेट्टी

साखरेची सध्याची दरवाढ कृत्रिम असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. श्रीराम सहकारी साखर कारखाना सुरू ठेवण्यासाठी गरज पडल्यास आंदोलन करू, असेही त्यांनी सांगितले.

स्थैर्य, फलटण, दि. २५ ऑगस्ट : देशात पुरेसा साखरसाठा असतानाही साखरेच्या किमती अचानक वाढण्यामागे साठेबाजीची शक्यता असून, सरकारने खासगी व्यापारी, सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांची गोदामे तपासावीत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. साखरेच्या वाढलेल्या किमतीचा फायदा ऊस उत्पादकांनाही मिळाला पाहिजे आणि कारखान्यांनी प्रतिटन ३०० ते ५०० रुपयांपर्यंत अंतिम हप्ता द्यावा, अशी मागणीही त्यांनी फलटणमधील पत्रकार परिषदेत केली.

‘साखरेची दरवाढ अनैसर्गिक’

शेट्टी म्हणाले, देशात साखरेची टंचाई असल्याचे चित्र नसताना बाजारातील दर अचानक वाढले आहेत. सरकारच्या आकडेवारीनुसार देशात सुमारे ३५ लाख टन साखर शिल्लक असून, महिन्याला सुमारे २२ लाख टन साखरेचा खप आहे. दक्षिण भारतातील कारखानेही लवकरच सुरू होणार असल्याने सध्याच्या दरवाढीमागील कारण सरकारने स्पष्ट करावे.

मागील हंगामातील शिल्लक साठा, त्यानंतर झालेले उत्पादन, देशांतर्गत विक्री आणि निर्यात यांचा हिशेब पाहता प्रत्यक्षात अधिक साखर शिल्लक राहणे अपेक्षित असल्याचा दावा शेट्टी यांनी केला. उपलब्ध आणि शिल्लक साखरेच्या आकडेवारीतील तफावत नेमकी कशी निर्माण झाली, याचा हिशेब लागला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

गोदामे तपासण्याची मागणी

कमी दरात साखर खरेदी करून व्यापाऱ्यांनी ती साठवून ठेवली असण्याची शक्यता शेट्टी यांनी व्यक्त केली. खासगी व्यापारी, सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांच्या गोदामांतील नोंदी आणि प्रत्यक्ष साठा तपासावा. नोंदीपेक्षा अतिरिक्त साखर आढळल्यास ती जप्त करावी, अशी मागणी त्यांनी केली.

या मागणीसाठी पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना पत्र पाठवल्याचेही शेट्टी यांनी सांगितले. साखर जीवनावश्यक वस्तूंमध्ये येत असल्याने साठा तपासण्याचे अधिकार सरकारकडे असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘२२ ते २३ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा संशय’

साखरेच्या उपलब्धतेच्या आकडेवारीतील तफावतीवरून शेट्टी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. शेजारील देशांमध्ये साखरेचे दर अधिक असल्याने मोठ्या प्रमाणावर साखर देशाबाहेर गेली असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. तसे झाले असल्यास केंद्र सरकारच्या संबंधित यंत्रणांनी त्याचे उत्तर द्यावे, असे ते म्हणाले.

साखरेच्या पूर्वीच्या आणि सध्याच्या बाजारभावातील फरक तसेच त्यांच्या मते हिशेबात न दिसणाऱ्या साखरेचे प्रमाण लक्षात घेतल्यास हा सुमारे २२ ते २३ हजार कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. ही रक्कम ग्राहकांच्या खिशातून गेल्याचा दावाही त्यांनी केला.

ऊस उत्पादकांना अंतिम हप्ता देण्याची मागणी

साखरेच्या वाढलेल्या दराचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही मिळाला पाहिजे, अशी भूमिका शेट्टी यांनी मांडली. एफआरपी ठरवताना साखरेचा अपेक्षित दर कमी होता. आता शिल्लक साखर अधिक दराने विकली जात असल्याने त्यातून मिळणाऱ्या अतिरिक्त उत्पन्नाचा हिशेब शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कारखान्यांकडे शिल्लक असलेल्या साखरेच्या प्रमाणानुसार अतिरिक्त उत्पन्नात फरक पडू शकतो. मात्र प्रत्येक साखर कारखान्याने ऊस उत्पादकांना प्रतिटन ३०० ते ५०० रुपयांपर्यंत अंतिम हप्ता दिला पाहिजे, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

शक्तिपीठ महामार्गाला विरोध कायम

शक्तिपीठ महामार्गाबाबत शेट्टी यांनी आपला विरोध पुन्हा स्पष्ट केला. राज्य आणि केंद्र सरकारची धोरणे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतीचे घटते क्षेत्र आणि विविध प्रकल्पांसाठी होणाऱ्या जमीन संपादनाचा मुद्दा उपस्थित केला.

जमिनीशी संबंधित गैरप्रकारांसह राज्यात भूमाफिया आणि इतर प्रकारचे माफिया सक्रिय असल्याचा आरोपही त्यांनी केला. अमली पदार्थांच्या वाढत्या समस्येबाबत आपण यापूर्वीच सरकारला इशारा दिला होता, असेही शेट्टी म्हणाले.

श्रीराम कारखान्यासाठी आंदोलनाचा इशारा

फलटणमधील श्रीराम सहकारी साखर कारखान्याबाबत बोलताना शेट्टी यांनी हा कारखाना सहकारात आणि शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिला पाहिजे, अशी भूमिका मांडली. परिसरातील अन्य कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवल्यामुळे उसासाठी स्पर्धा निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्रीराम कारखाना बंद पडावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ऐकिवात असल्याचा दावा करत शेट्टी यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. श्रीराम कारखाना सुरू ठेवण्यासाठी गरज पडल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आंदोलन करून सरकारला कारखाना सुरू करण्यास भाग पाडतील, असा इशारा त्यांनी दिला.

‘ऊस घालवण्याची घाई करू नका’

आगामी हंगाम साखर उद्योगासाठी चांगला राहण्याची शक्यता शेट्टी यांनी व्यक्त केली. साखरेचे भाव चढे राहण्याची शक्यता असून आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीचाही त्यावर परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

पुढील हंगामात साखर कारखाने सुमारे तीन महिने चालतील एवढाच ऊस उपलब्ध राहण्याचा अंदाज व्यक्त करत त्यांनी शेतकऱ्यांना ऊस घालवण्याची घाई करू नका, तर उसाला चांगला दर कसा मिळेल याकडे लक्ष द्या, असे आवाहन केले.

दूध दरवाढीत संयमाची भूमिका

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांबाबत बोलताना शेट्टी यांनी कारवाईमुळे निकृष्ट दर्जाच्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाल्याचे मत व्यक्त केले. दूध खरेदी दर वाढवताना त्याचा थेट भार ग्राहकांवर पडणार नाही, याचाही विचार करावा लागेल, असे त्यांनी सांगितले.

दुधाची टंचाई असली तरी दूध संस्थांनी अनिष्ट स्पर्धेतून मोठी दरवाढ करण्याऐवजी संयम बाळगावा. दर मोठ्या प्रमाणात वाढल्यास त्याचा दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या खपावर परिणाम होऊ शकतो, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.

Back to top button
Don`t copy text!