मराठी व्याकरणाचा भक्कम स्तंभ ढासळला !

मराठी भाषा आणि व्याकरणाच्या क्षेत्रात अमूल्य योगदान देणार्‍या ज्येष्ठ भाषातज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे सोमवारी (दि. २४) वृद्धापकाळाने निधन झाले. त्या १०१ वर्षांच्या होत्या. दुपारी तीन वाजता बाणेर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात प्रा. रूमा बावीकर आणि डॉ. शमा भागवत या दोन मुली आहेत.

प्रा. शेख यांनी शालेय व महाविद्यालयीन स्तरावर ३४ वर्षे अध्यापन केले. मुंबईच्या एस.आय.ई.एस. महाविद्यालयात त्या सहा वर्षे मराठी विभागप्रमुख होत्या. याशिवाय, शासनाच्या ‘स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर’मध्ये त्यांनी १० वर्षे ’आयएएस’ विद्यार्थ्यांना व्याकरण व भाषाशास्त्र शिकवले. बालभारतीच्या पाठ्यपुस्तक संपादनात ७ वर्षे आणि ‘कार्यात्मक व्याकरण’ पुस्तकनिर्मितीत त्यांचा मोलाचा सहभाग होता.

त्यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, स्थानिक कार्यवाह सुनील महाजन, ज्येष्ठ साहित्यिक भानू काळे, दिलीप फलटणकर, मुस्लिम सत्यशोधक संस्थेचे अध्यक्ष डॉ. शमशुद्दिन तांबोळी आणि उद्योजक अभय फिरोदिया यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.

जीवनपट
“भाषा हा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे. तो जपणे आणि समृद्ध करणे ही प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे,” या श्रद्धेने आयुष्यभर मराठी भाषेची व्रतस्थ सेवा करणार्‍या प्रा. यास्मिन शेख काळाच्या पडद्याआड गेल्या. शंभर वर्षे पूर्ण केलेल्या यास्मिनताईंचे मराठी भाषेवर अफाट प्रेम होते.

जन्माने ज्यू (पूर्वाश्रमीच्या ’जेऊषा ऊबेन’) असलेल्या यास्मिनताईंनी १९५० मध्ये अझीझ अहमद इब्राहिम शेख (डॅडी शेख) यांच्याशी विवाह केला. ज्येष्ठ साहित्यिक वसंत कानेटकर यांच्या पुढाकाराने ही भेट झाली होती. विवाहानंतर त्यांनी धर्म बदलला नाही, मात्र नाव बदलून त्या ‘यास्मिन शेख’ झाल्या. प्रा. श्री. म. माटे यांच्या विद्यार्थिनी असलेल्या शेख यांनी श्री. पु. भागवत आणि वसंत कानेटकर यांच्यासोबतही काम केले.

मराठी व्याकरणाच्या सुलभतेसाठी त्यांनी लिहिलेले ‘मराठी शब्दलेखनकोष’ आणि ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ हे ग्रंथ अभ्यासकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. ‘अंतर्नाद’ मासिकाच्या त्या व्याकरण सल्लागार होत्या. त्यांच्या बहुमोल योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार’ (२०१७), ‘डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार’ (२०१५), ‘मसाप जीवनगौरव पुरस्कार’ अशा अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही त्यांचा सत्कार होणार होता, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या उपस्थित राहू शकल्या नव्हत्या. मराठी भाषेचे शुद्धरूप टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील.

वैविध्यपूर्ण पैलू व कर्तृत्व
मराठी व्याकरण आणि भाषाशास्त्र म्हटलं की प्रा. यास्मिन शेख हे नाव आदराने घेतले जाते. जन्माने ज्यू धर्म, मुस्लिम व्यक्तीशी विवाह आणि आयुष्यभर मराठी भाषेची साधना… असा अत्यंत दुर्मिळ अन् अनोखा जीवनप्रवास त्यांनी जगला.

प्रा. यास्मिन शेख यांच्या जीवनप्रवासाचे महत्त्वाचे टप्पे :

  • ३४ वर्षे शालेय व महाविद्यालयीन अध्यापन.
  • मुंबईतील एस.आय.ई.एस. महाविद्यालयात ६ वर्षे मराठी विभागप्रमुख.
  • १० वर्षे भावी ‘आयएएस’ अधिकार्‍यांना व्याकरण व भाषाशास्त्राचे धडे.
  • ७ वर्षे बालभारती पाठ्यपुस्तक संपादन आणि ‘कार्यात्मक व्याकरण’ पुस्तकाची निर्मिती.

प्रमुख प्रसिद्ध पुस्तके :

  • मराठी शब्दलेखनकोष
  • मराठी लेखन मार्गदर्शिका

प्रमुख पुरस्कार व सन्मान :

  1. डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार (महाराष्ट्र शासन, २०१७)
  2. डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार (२०१५)
  3. मसाप जीवनगौरव पुरस्कार
  4. शिक्षणप्रेमी शांतारामशेठ शहासने जीवनगौरव पुरस्कार

मराठी व्याकरण सोपे करून सांगणे आणि भाषेचे सौंदर्य जपणे ही त्यांची जीवननिष्ठा होती. एका ज्यू कुटुंबात जन्मलेली व्यक्ती मराठी भाषेची सर्वोच्च अभ्यासक बनते, हा मराठी भाषेच्या समृद्धतेचा आणि त्यांच्या अफाट कर्तृत्वाचा मोठा पुरावा आहे.

Back to top button
Don`t copy text!