एक रुपयांत पीक विमा योजनेत जिल्ह्यातील 91500 शेतक-यांची रेकॉर्डब्रेक नोंदणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २९ जुलै २०२३ । सातारा । नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग इ. कारणाने पिकाचे नुकसान झाल्यास शेतक-याचे स्थैर्य अबाधित राखणेसाठी शासनाने खरीप हंगाम 2023 साठी पंतप्रधान फसल बीमा योजना पुढे सुरु ठेवणेस मान्यता दिली आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय महसूल मंडलनिहाय पिके व क्षेत्र अधिसूचित केली असून त्याप्रमाणे भात, ख. ज्वारी, चाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद व ख. कांदा या 9 पिकांसाठी जिल्ह्यामध्ये ही योजना लागू असून या योजनेमध्ये सहभागी होणेसाठी 31 जुलै 2023 ही अंतिम मुदत आहे या योजनेचे प्रमुख वैशिष्ठ म्हणजे शेतक-यांनी फक्त 1 रुपया विमा हप्ता रक्कम भरावयाची असून उर्वरीत विमा हप्ता रक्कम शासन भरणार आहे. या योजनेंतर्गत संरक्षित रकमेची सांगड पिकाच्या आधारभूत किंमतीशी घातल्याने सरक्षित रकमेत वाढ झाली आहे, परंतु विमा हप्ता दर 2 टक्के असूनही शेतकऱ्यांना फक्त एक रुपया भरुन योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे.

खरीप हंगाम 2023 मध्ये या योजनेत आजअखेर जिल्ह्यातील सुमारे 91 हजार शेतक-यांनी सहभाग नोंदविला असून योजना सुरु झाल्यापासूनचा हा उच्चांक आहे. तथापि जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी अजूनही या योजनेत सहभागी झाले नसल्याने त्यांनी दि 31 जुलै 2023 पूर्वी या योजनेत सहभागी होणेचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.

कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांना या योजनेत सहभागी होता येईल. कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांना ही योजना ऐच्छिक असल्याने त्यांनी ज्या शेतातील अधिसूचित पिकाचा विमा उतरावयाचा आहे, त्या शेताचा 7/12 उतारा व खाते उतारा (8 अ) घेऊन आपले ज्या राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते आहे त्या ठिकाणी आपला विमा हप्ता भरावयाचा आहे. तसेच सार्वजनिक सुविधा केंद्रामार्फत पोस्ट कार्यालय व विमा कंपनीच्या संकेत स्थळावरुनही विमा हप्ता भरणेची व्यवस्था करणेत आली आहे 7/12 उता-यावर पीकाची नोंद नसल्यास सदर शेतात अधिसूचित पीक असल्याचा स्वयं घोषणापत्र जोडणे आवश्यक आहे.

या योजनेतर्गत गारपीट, भूसख्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय होणे, ढगफुटी, चक्रीवादळ अथवा विज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी नुकसान भरपाई वैयक्तिक पातळीवर निश्चित करणेची व्याप्ती वाढविणेत आली आहे. अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे योजनेत सहभागी शेतक-यांचे वैयक्तिकरित्या नुकसान झाल्यास सदर शेतक यानी वित्तीय संस्थेस (बँकेस) अथवा विमा कंपनीस नुकसान झालेपासून 72 तासाचे आत नुकसानग्रस्त अधिसूचित पिकाची माहीती नुकसानीचे कारण व प्रमाण कळविणे आवश्यक आहे. या योजनेतील संरक्षित बाबी  पीक पेरणी पूर्वी लावणीपूर्व नुकसान भरपाई,  हंगामामधील प्रतिकुल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करणे, पीक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट (उभे पीक),

स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, काढणी पश्चात नैसर्गिक कारणामुळे होणारे नुकसान अनिश्चित हवामानामुळे पिकांचे अतोनात नुकसान होत असल्याने तसेच पिकांच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतक-यांचे अधिक स्थैर्य अबाधित राखण्याचे काम या योजनेद्वारे होत असल्याने व फक्त एक रुपयांमध्ये योजनेत सहभागी होत येणार असल्याने व योजनेत सहभागी होणेस फक्त 3 दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने जिल्ह्यातील सर्व पात्र शेतक-यांनी या योजनेत सहभागी होणेचे आवाहन करणेत येत आहे. योजनेत सहभागी होणेसाठी आवश्यक विहीत नमुन्यातील अर्ज बँकेकडे व विमा कंपनीकडे उपलब्ध असून शेतक-यांनी ज्या राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा मध्यवती बँकेत आपले खाते आहे त्या बँकेत जाऊन अथवा विमा कंपनी कार्यालयातून किंवा सार्वजनिक सुविधा केंद्र, पोस्ट कार्यालय, विमा कंपनी प्रतिनिधी व विमा कंपनीच्या संकेतस्थळाद्वारे 31 जुलै 2023 पूर्वी हप्ता भरणेविषयीचे तसेच अधिक माहीतीसाठी गाव पातळीवरील कृषि सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केलेले आहे.


Back to top button
Don`t copy text!