फलटणच्या रवींद्र धुमाळ यांना ‘यशवंतराव चव्हाण फलोत्पादन पुरस्कार’

सातारा जिल्हा परिषदेतर्फे धुमाळवाडीचे शेतकरी रवींद्र धुमाळ यांना कृषी दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण फलोत्पादन शेती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

स्थैर्य, सातारा, दि. 02 जुलै : सातारा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात फलटण तालुक्यातील धुमाळवाडी येथील प्रगतशील शेतकरी रवींद्र धुमाळ यांना ‘कै. यशवंतराव चव्हाण फलोत्पादन शेती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या पुरस्कारात त्यांनी सातारा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

फळशेतीतील ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव

रवींद्र धुमाळ यांना फळशेतीमध्ये तब्बल ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी आपल्या शेतीत सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करण्यावर विशेष भर दिला आहे. तसेच १०० टक्के शेतीसाठी ठिबक सिंचन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला आहे. डाळिंब पिकातील छाटणी, फळबागांचे नियोजन आणि अचूक आर्थिक नोंदी ठेवण्याच्या त्यांच्या कसबामुळे ते एक आदर्श शेतकरी ठरले आहेत. त्यांच्या या सातत्यपूर्ण कामाची दखल घेत त्यांना हा बहुमान देण्यात आला आहे.

मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव

यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा शेतकरी सन्मान सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे होत्या. यावेळी उपाध्यक्ष राजू भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे आणि प्रकल्प संचालक अजय शेंडे उपस्थित होते. कृषी समितीच्या सभापती लता कर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

Back to top button
Don`t copy text!