
सोमवार पेठेतील क्रांतिसिंह नाना पाटील मागासवर्गीय गृहरचना संस्थेच्या जागा नियमित करून परिसराला तेच नाव देण्याची मागणी सागर चव्हाण यांनी केली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २ जुलै : फलटण शहरातील सोमवार पेठेतील क्रांतिसिंह नाना पाटील मागासवर्गीय गृहरचना सहकारी संस्थेतील मूळ सदस्यांच्या जागा नियमित करून त्यांना आवास योजनेचा लाभ द्यावा. तसेच या परिसराला ‘क्रांतिसिंह नाना पाटील नगर’ असे नाव द्यावे, अशी आग्रही मागणी सागर चव्हाण यांनी पालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आवास योजनेच्या लाभाची मागणी
तत्कालीन खासदार दिवंगत हिंदुराव निंबाळकर यांनी सोमवार पेठेतील कुटुंबांसाठी ही संस्था स्थापन केली होती. सध्या संस्थेची मूळ कार्यकारिणी अस्तित्वात नसून अनेक कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. मात्र, जी मूळ कुटुंबे तेथे अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत, त्यांच्या आवास योजनेच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मूळ संस्थापक सदस्य किंवा त्यांच्या वारसदारांच्या अर्जांचा स्वतंत्र विचार करून त्यांना शासनाच्या नियमानुसार जागा नियमित करून द्याव्यात, असे निवेदनात म्हटले आहे.
नामकरणाबाबत पुनर्विचार व्हावा
शासनाने २५ मार्च २०२६ रोजी शासकीय जागेवरील १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार संबंधित कुटुंबांचा सकारात्मक विचार व्हावा. तसेच, नगरपरिषदेने या परिसराला ‘श्री फिरंगाई देवी नगर’ असे नाव देण्याचा ठराव नुकताच मंजूर केला आहे. परंतु, महसूल विभागात या जागेची नोंद ‘क्रांतिसिंह नाना पाटील मागासवर्गीय गृहरचना संस्था’ अशीच आहे.
त्यामुळे तत्कालीन खासदारांच्या दूरदृष्टीचा विचार आणि महापुरुषांच्या कार्याचा गौरव म्हणून आगामी सर्वसाधारण सभेत या परिसराला ‘क्रांतिसिंह नाना पाटील नगर’ हेच नाव द्यावे. या मागण्यांचे निवेदन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर आणि मुख्याधिकारी निखिल जाधव यांना देण्यात आले आहे.
