…. ही अशी कीड आहे जी या सहकारी संस्थांना दिवसेंदिवस पोखरून खात आहे; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची सडकून टीका

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर सहकारी संस्था डबघाईला आणल्याचा गंभीर आरोप करत त्यांच्या कारभारावर सडकून टीका केली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ६ जुलै : तालुक्यातील सहकारी संस्थांची केलेली दुर्दैवी अवस्था आणि मनमानी कारभारावरून माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजे आणि त्यांच्या भावंडांवर अत्यंत खरमरीत शब्दांत प्रहार केला आहे. “रामराजे व त्यांच्या भावंडांचा सहकारी संस्थांना मोठा शाप लागला असून, यांची ही अशी कीड आहे जी या संस्थांना दिवसेंदिवस पोखरून खात आहे,” असा घणाघाती आरोप रणजितदादांनी केला आहे.

सहकारी संस्थांच्या भवितव्यावर चिंता व्यक्त करताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, या मंडळींचा सगळंच भाड्याने देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. श्रीराम कारखाना, मालोजी बँक, डेअरी हे सर्व स्वतः काहीही चालवू शकत नसल्यानेच ते भाड्याने देण्याचा घाट घातला जात आहे. स्वतःच्या अकार्यक्षमतेमुळेच या सर्व संस्था डबघाईला नेल्या जात आहेत.

२०० रुपये प्रति टनाची खाबुगिरी आणि खाजगीकरणास विरोध

कारखान्याच्या भाड्याच्या आणि आर्थिक व्यवहारांच्या मुद्द्यावर जोरदार टीका करताना ते पुढे म्हणाले की, जगामध्ये हा एकमेव असा साखर कारखाना असेल की त्याचे भाडे हे काळाप्रमाणे वाढण्याऐवजी त्यात कायम घटच होत आली आहे. खऱ्या अर्थाने या भाड्यात वाढ झाली पाहिजे होती, परंतु तसे न होता प्रत्येक टनाच्या मागे हे २०० रुपये खात आले आहेत, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. कोणत्याही ‘सहकारी’ संस्थेला आपला कारखाना चालवायला देण्यास आमची काहीही हरकत नाही, परंतु हा कारखाना ‘खाजगी’ करण्याच्या त्यांच्या कोणत्याही मनसुब्यांना आमचा कायम व तीव्र विरोधच असणार आहे, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

‘स्वराज’च्या प्रगतीमुळे पोटशूळ; थकीत बिलांचे आव्हान

उपळवे येथील स्वराज कारखान्याच्या मुद्यावरून विरोधकांना चोख प्रत्युत्तर देताना रणजितदादा म्हणाले की, “उपळवे कारखाना हा माझ्या आजोबांनी उभा केला नाही, तर तो मी स्वतःच्या हिमतीवर उभा केला आहे. आज फलटण तालुक्यातील सर्वाधिक उसाचे गाळप आपला स्वराज कारखाना करतो. यांनी वडिलोपार्जित संस्था मोडून खाल्ल्यामुळे, आम्ही हिमतीने उभा केलेला विकासाचा हा डोंगर आणि स्वराज कारखाना यांच्या पोटात दुखत आहे.”

शेतकऱ्यांच्या बिलांबाबत ठणकावून सांगताना ते म्हणाले की, “स्वराज कारखान्याकडे कुणाचेही पेमेंट कधीही राहिले नाही आणि राहणारही नाही. जर स्वराजचे पेमेंट थकीत असते, तर जनतेने तुमच्या तोंडाला काळे फासून तुम्हाला कधीच घरी बसवले नसते.”

१२४ कोटींचे भुयारी गटार कुणी गायब केले?

नगराध्यक्षांवर १५% कमिशनचा खोटा आरोप करणाऱ्यांचा बुरखा फाडताना रणजितदादांनी थेट सवाल केला की, “१५ टक्क्यांचे आरोप करणाऱ्यांनी आधी सांगावे की, फलटण शहराचे १२४ कोटींचे भुयारी गटार कुणी गायब केले? आणि त्यानंतरच खोट्या वलग्ना कराव्यात”

श्रीराम कारखाना बंद पाडण्याचे पाप आणि कै. हणमंतराव पवारांचे निधन

श्रीराम कारखान्याच्या पडझडीला कोण जबाबदार आहे, याचा पर्दाफाश करताना ते म्हणाले की, “श्रीराम मंदिरात मीटिंग घेऊन, झोन बंदी उठवून श्रीराम कारखाना त्यावेळी कोणी बंद पाडला? या सगळ्या दबावातूनच कै. हणमंतराव पवार यांचे अपघाती निधन झाले. हे पाप आणि हा इतिहास इथली जनता कधीही विसरणार नाही.”

स्वतःच्या मुला-मुलींना पहिल्या नोकऱ्या; तरुणांवर अन्याय

तालुक्यातील तरुणांच्या रोजगाराच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सडकून टीका केली. “महिंद्रा नावाचे गोडाऊन स्वतःच्या पुत्रासाठी फलटणमध्ये आणले व त्यामध्ये पहिले काम हे स्वतःच्या पुत्राला दिले. तर कमिन्समध्ये पहिले काम हे स्वतःला ‘श्रीमंत’ म्हणवून घेणाऱ्यांनी स्वतःच्या मुलीला दिले. तालुक्यातील बेरोजगार युवक हा दुजाभाव आणि स्वार्थ कधीही विसरू शकणार नाहीत,” असा संताप त्यांनी व्यक्त केला.

कितीही जादूटोणा करा, सूर्य उगवायचा राहणार नाही!

शेवटी विरोधकांच्या अपप्रवृत्तींवर प्रहार करताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ठाम विश्वास व्यक्त केला की, “यांनी कितीही जादूटोणा केला तरी सुद्धा सूर्य हा उगवायचा राहणार नाही. फलटण तालुका हा राज्यातील सर्वात प्रगत तालुका आपण करून दाखवणारच, त्यासाठी फलटणची जनता हि आमच्यासोबत आहे.”

Back to top button
Don`t copy text!