रामराजेंना माझी काळजी; हातात तुतारी घेणार नाहीत – खासदार रणजितसिंह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २२ मार्च २०२४ | फलटण |
श्रीमंत रामराजेंना माझ्या उमेदवारीची काळजी २०१९ लाही होती व आताही त्यांना माझी काळजी आहे. मी निवडणुकीत पडू नाही, म्हणून ते काळजी करत असतात. मागील लोकसभा निवडणुकीत मी फलटण तालुक्यासह माढा लोकसभा मतदारसंघात मताधिक्क्य घेतले. श्रीमंत रामराजे माझ्या कुटुंबातीलच असल्याने त्यांना माझी जास्त काळजी आहे. दिवसभरात ते नेहमी माझ्यावर बोलत असतात. श्रीमंत रामराजे माझ्या विरोधात हातात तुतारी घेणार नाहीत. कारण त्यांनी जर तुतारी घेतली तर ती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी सरळसरळ गद्दारी होईल व ते त्यांना पचणार नाही, असे विधान माढ्याचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज मुंबईत एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले.

लोकसभा निवडणूक २०२४ साठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा माढ्यातून भाजपातर्फे उमेदवारी जाहीर झाली असताना विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या उमेदवारीला सुरूवातीपासूनच विरोध केला होता. आताही ते खासदार रणजितसिंह यांची उमेदवारी रद्द व्हावी, यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. दरम्यान, त्यांनी गुरुवारी येत्या आठ दिवसात आपला निर्णय जाहीर करू, असे सांगितले आहे. याबाबत मुंबईत एका वृत्तवाहिनीने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विचारले असता खासदार रणजितसिंह यांनी वरील विधान केले आहे. यामुळे माढ्याचे राजकारण आणखीनच तापणार असून श्रीमंत रामराजे पुढे काय भूमिका घेतात, यावर माढा लोकसभा निवडणुकीचा निकाल ठरणार आहे.

रामराजेंच्या फलटणमधील बैठकीबाबत बोलताना खासदार रणजितसिंह म्हणाले की, मी सर्वांना बरोबर घेऊनच चालणार असून ‘सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास’ या पक्षाच्या धोरणानुसारच पुढील वाटचाल करणार आहे.

माझ्या विकासकामांचे श्रेय घेतात व त्यांना लोकांविषयी प्रेम नाही, खासदार केवळ जाहिरातबाजी करतात, या श्रीमंत रामराजेंच्या विधानाला उत्तर देताना खासदार रणजितसिंह म्हणाले की, विकासकामांचे सर्व श्रेय मी रामराजेंना दिलेले आहे आणि त्यामुळे त्यांनी उदास होण्याचे कारण नाही, योग्य वेळ आल्यानंतर मी स्वत: जाऊन त्यांचा सत्कार करेन. माझे श्रेय विकासकामांमध्ये नाही, असे माझे मत आहे.

रामराजे तुतारी हातात घेतील का, यावर बोलताना खासदार रणजितसिंह म्हणाले की, श्रीमंत रामराजे तुतारी हातात घेणार नाहीत. कारण रामराजेंनी तुतारी हातात घेतली तर ज्या अजितदादांनी त्यांना सहकार्य केले, त्यांच्याशी सरळसरळ गद्दारी केल्यासारखे होईल. ते रामराजे करू शकत नाहीत.

दरम्यान, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र धैर्यशील मोहिते पाटील हेही माढा लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले असून तेही आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी अडून बसले आहेत. त्यामुळे माढ्याचा तिढा सुटण्याची चिन्हे धूसर झाली आहेत. याबाबत खासदार रणजितसिंह यांना विचारले असता ते म्हणाले की, मोहिते-पाटील आमच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांचे आणि माझे ऋणानुबंध आहेत. आमच्या पक्षामधील ते एक मोठे घराणे आहे. मी त्यांचा सन्मान करतो. त्यांच्याबद्दल मी कोणतेही विधान करणार नाही.

आ. राम सातपुते यांच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत बोलताना खासदार रणजितसिंह म्हणाले की, सोलापूर आणि माढ्याचा खासदार म्हणून माझी इच्छा आहे की, आ. सातपुते यांनी जरी सोलापूरची निवडणूक लढविली तर ते निश्चित निवडून येतील. पक्षाला एक धारदार युवा नेतृत्व मिळेल आणि मलाही एक सोलापूरमधून चांगला सहकारी मिळेल. जेणेकरून आम्ही दोघेही सोलापूर जिल्ह्याचा चांगला विकास करू. पक्षाला आणि सोलापूरच्या जनतेला आ. राम सातपुतेंचा चांगला फायदा होईल.

प्रणिती शिंदे यांना काँग्रेसमधून सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली असताना आ. राम सातपुते निवडून येतील का, यावर बोलताना खासदार रणजितसिंह म्हणाले की, आ. राम सातपुते पक्षाच्या मुशीत तयार झालेले नेते आहेत. घरचे कुठलेही ‘फॅमिली बॅकग्राऊंड’ नसताना एका ऊसतोड मजुराचा नेता स्वत:च्या ताकदीवर व कर्तृत्वावर इथपर्यंत येतो. आ. सातपुते संघर्षातून तयार झालेला कार्यकर्ता व नेता असून तो कुणाविरोधातही लढू शकतो व जिंकू शकतो, असे मला वाटते.


Back to top button
Don`t copy text!