
‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये जगातील सर्वात तरुण महिला नगरसेविका म्हणून नोंद झालेल्या फलटण नगरपरिषदेच्या भाजपच्या नगरसेविका सिद्धाली अनुप शहा यांचा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सन्मान केला.
स्थैर्य, फलटण, दि. ३० ऑगस्ट : जगातील सर्वात तरुण महिला नगरसेविका म्हणून ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने नोंद घेत गौरव केल्याबद्दल, माजी खासदार राजू शेट्टी यांनी फलटण नगरपरिषदेच्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांचा नुकताच यथोचित सन्मान करून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
मुलींचे राजकारणातील पाऊल ही मोठी गोष्ट:
कु. सिद्धाली शहा यांच्या या जागतिक विक्रमाचे आणि अद्वितीय कामगिरीचे कौतुक करताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी अत्यंत समाधान व्यक्त केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “फलटणसारख्या निमशहरी भागातून मुली राजकारणात पाऊल टाकत आहेत आणि नेतृत्व करत आहेत, ही खरोखरच फार मोठी आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. आमचे जुने मित्र आणि माजी नगरसेवक अनुप शहा यांनी त्यांच्या कन्येला राजकारणात सक्रिय करून समाजात एक नवा आणि सकारात्मक आदर्श निर्माण केला आहे.”
या उल्लेखनीय जागतिक विक्रमाबद्दल माजी खासदार राजू शेट्टी यांनी कु. सिद्धाली शहा यांना त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. या सत्कार प्रसंगी फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अनुप शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.