
थेट WhatsApp वर मिळवा
सातारा जिल्हा बँक निवडणुकीनंतर फलटण तालुक्यात राजे गटाला मोठे भगदाड पडले आहे. होळ सोसायटीचे माजी चेअरमन हनुमंत भोसलेंसह अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
स्थैर्य, फलटण, दि. १० नोव्हेंबर : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या फलटण तालुका सोसायटी मतदारसंघाची चुरशीची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीनंतरही तालुक्यातील राजकीय उलथापालथ थांबलेली नसून, विरोधी राजे गटाला लागलेली गळती कायम असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. होळ सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक हनुमंत भोसले आणि पैलवान संतोष भोसले यांच्यासह राजे गटाच्या अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
या महत्त्वपूर्ण पक्षप्रवेशाच्या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सातारा जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक तथा माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सर्वांचे भाजपचा मफलर घालून पक्षात स्वागत केले व त्यांना पुढील वाटचालीस भक्कम साथ देण्याची ग्वाही दिली.
यावेळी होळ सोसायटीचे माजी चेअरमन हनुमंत भोसले आणि पैलवान संतोष भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोपट भोसले, कृष्णात भोसले, बाळासाहेब भोसले, रोहिदास शिंदे, रोहित भोसले, सिद्धू भोसले, सोनू शिंदे आणि शुभम शिंदे आदी कार्यकर्त्यांनी राजे गटाला रामराम ठोकत भाजपचा झेंडा हाती घेतला.
राजे गटाला मोठे भगदाड अन् भाजपची ताकद वाढली
नुकत्याच झालेल्या जिल्हा बँक निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातून अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. मात्र, या निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच तालुक्यातील गावोगावचे प्रमुख कार्यकर्ते आणि संस्थांचे पदाधिकारी रणजितदादांच्या विकासकामांवर आणि आक्रमक कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून भाजपमध्ये सामील होत आहेत. होळमधील या मोठ्या पक्षप्रवेशामुळे राजे गटाला मोठे भगदाड पडले असून, एकामागून एक धक्के देत रणजितदादांनी आखलेल्या या राजकीय रणनीतीमुळे फलटण तालुक्यात भाजपची ताकद आणखी भक्कम होत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.





