राजाळेतील ‘एक गाव, एक गणपती’चा अनोखा उपक्रम; लकी ड्रॉद्वारे महिलांना घडवली कोल्हापूरची सहल

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राजाळे येथील ‘एक गाव, एक गणपती’ मंडळाने रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक सलोख्याचा संदेश देत महिलांसाठी विशेष सहलीचे आयोजन केले. या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्थैर्य, राजाळे, दि. २२ ऑगस्ट : ‘एक गाव, एक गणपती’ गणेशोत्सव मंडळ राजाळे यांच्या वतीने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि सामाजिक सलोख्याने साजरा करण्यात आला. या उत्सवाला विधायक जोड देत विनोद शेडगे यांच्या पुढाकारातून महिलांसाठी आयोजित केलेली मोफत सहल यावर्षीचे प्रमुख आकर्षण ठरली.

सामाजिक सलोखा आणि स्पर्धांची रेलचेल

गणेशोत्सवात कोणत्याही जाती-पातीचा भेद न करता गावातील प्रत्येक मंडळाला आरतीचा मान देण्यात आला. सलग दहा दिवस नाट्यस्पर्धा, गौरी सजावट स्पर्धा, चौक आणि ट्रॉली डेकोरेशन स्पर्धा पार पडल्या. या सर्व स्पर्धांमधील विजेत्यांना आणि सहभागी मंडळांना प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. उत्सवाच्या माध्यमातून गावातील सर्व समाजघटकांना एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण काम मंडळाने केले.

महिलांसाठी लकी ड्रॉ आणि आनंददायी सहल

उत्सव काळात समाजसेवक विनोद शेडगे यांच्या वतीने महिलांसाठी दररोज लकी ड्रॉ काढण्यात आला. यातून निवड झालेल्या महिलांसाठी कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिर, कणेरी मठ, पन्हाळा आणि ज्योतिबा अशा एकदिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते. माजी सरपंच संभाजीराव निंबाळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या सहलीचा प्रारंभ करण्यात आला.

पैठणीची भेट आणि कृतज्ञता

सहलीदरम्यान महिलांच्या नाश्ता आणि भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. परतीच्या प्रवासात पुन्हा लकी ड्रॉ काढून पाच भाग्यवान महिलांना पैठणी साड्या भेट देण्यात आल्या. पुरुषांप्रमाणे महिलांनाही सहलीचा असा आनंद मिळवून दिल्याबद्दल रुपाली तोरसे यांनी सर्व महिलांच्या वतीने विनोद शेडगे यांचे आभार मानले. उत्सवातील या सर्वसमावेशक उपक्रमामुळे राजाळे गावात आनंदाचे आणि एकोप्याचे वातावरण पाहायला मिळाले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!