युपीआय शुल्क आकारणीवरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा; ‘डिजिटल सापळा’ रचल्याचा राज ठाकरेंचा आरोप

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

युपीआय शुल्क आकारणीवरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा; ‘डिजिटल सापळा’ रचल्याचा राज ठाकरेंचा आरोप

दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या युपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडक शब्दांत टीका केली आहे.

स्थैर्य,सातारा, दि. २० सप्टेंबर : दोन हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या निवडक युपीआय व्यवहारांवर ०.४ टक्के मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सरकारने नागरिकांना आधी डिजिटल व्यवहारांची सवय लावून नंतर शुल्काचा ‘डिजिटल सापळा’ रचल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.

व्यापारी आणि ग्राहकांवर अतिरिक्त भार

राज ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे आपली भूमिका मांडताना सांगितले की, नोटाबंदीनंतर देशातील नागरिकांना युपीआय आणि डिजिटल व्यवहारांकडे वळवण्यात आले. आता अचानक या व्यवहारांवर शुल्क लादून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. जरी हे शुल्क व्यापाऱ्यांकडून आकारले जाणार असले, तरी त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भार ग्राहकांवरच पडणार आहे. हा अतिरिक्त खर्च ग्राहकांवर ढकलला जाणार नाही, याची कोणतीही ठोस यंत्रणा सरकारकडे नाही.

व्यापाऱ्यांना विरोधाचे आवाहन

या धोरणामुळे लहान-मोठे व्यापारी आणि सामान्य नागरिक दोघांचेही आर्थिक गणित बिघडणार असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी व्यापाऱ्यांना या अन्यायी शुल्काला जोरदार विरोध करण्याचे आवाहन केले आहे. सरकारच्या अशा अपारदर्शक निर्णयांमुळे नागरिकांची फसवणूक होत असल्याचे मत व्यक्त करत त्यांनी या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे.

 

Back to top button
Don`t copy text!