फलटणमध्ये गणेशोत्सवासाठी ध्वनिक्षेपकांवर निर्बंध; ‘या’ भागात सात दिवस बंदी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

फलटण शहरातील गणेशोत्सव काळात शांतता राखण्यासाठी प्रशासनाने ध्वनिक्षेपक वापरावर निर्बंध घातले असून, काही भागांत सात दिवस वापरास मनाई केली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २० सप्टेंबर : फलटण शहरातील गणेशोत्सव काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ (१) अंतर्गत ध्वनिक्षेपक वापराबाबत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. शहरातील श्री जबरेश्वर मंदिर परिसर आणि गणपती चौक ते टोपी चौक या मार्गावर दि. २० ते २६ सप्टेंबर या कालावधीत ध्वनिक्षेपक व कोणतीही ध्वनिवर्धक यंत्रणा वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.

श्री जबरेश्वर मंदिर परिसरात ध्वनिक्षेपकास मनाई

सहायक संचालक, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, कोल्हापूर उप-मंडळ यांनी दिलेल्या पत्रानुसार श्री जळेश्वर मंदिराला पुरातत्त्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. मोठ्या आवाजामुळे पुरातन वास्तूवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंदिर परिसरात ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास मनाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.

फलटण शहर पोलिसांनीही गणेशोत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री जबरेश्वर मंदिर परिसरात मोठ्या आवाजाच्या ध्वनिक्षेपकांमुळे मंदिराला धोका निर्माण होऊ नये, तसेच मुख्य प्रवेशद्वार आणि रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी निर्बंध लागू करण्याची मागणी केली होती.

२० ते २६ सप्टेंबरपर्यंत आदेश लागू

उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार श्री जबरेश्वर मंदिराच्या २०० मीटर परिसरात आणि गणपती चौक ते टोपी चौक, फलटण या रस्त्यावर दि. २० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीत श्री गणेशोत्सव मिरवणुकीसाठी कोणतीही ध्वनिवर्धक यंत्रणा वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

श्री जबरेश्वर मंदिराच्या वास्तूला व पुरातन शिल्पांना कोणतीही हानी होईल, असे कृत्य करण्यासही मनाई करण्यात आली आहे. नागरिक आणि गणेशोत्सव मंडळांनी आदेशाचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Back to top button
Don`t copy text!