
थेट WhatsApp वर मिळवा
केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी हंगामातील सहा प्रमुख पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला असून करडई पिकासाठी सर्वाधिक वाढ जाहीर केली आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ०१ ऑक्टोबर : केंद्र सरकारने २०२७-२८ या विपणन वर्षासाठी रब्बी हंगामातील सर्व ६ प्रमुख पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे देशातील लाखो शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळण्यास मदत होणार असून पीक विविधतेला प्रोत्साहन मिळणार आहे.
करडईला सर्वाधिक ६७५ रुपयांची वाढ
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी निर्णयांची माहिती दिली. यानुसार करडईच्या हमीभावात सर्वाधिक प्रति क्विंटल ६७५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गहू, हरभरा, बार्ली, मसूर आणि मोहरी या पिकांच्या दरातही वाढ मंजूर करण्यात आली आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत किमान ५० टक्के अधिक परतावा देण्याच्या धोरणानुसार हे दर निश्चित करण्यात आले आहेत.
हमीभाव खरेदीसाठी ९० हजार कोटींची तरतूद
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे रब्बी पिकांच्या हमीभाव खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हातात सुमारे ९०,९६२ कोटी रुपये जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढून कृषी क्षेत्राला गती मिळेल, असा विश्वास केंद्रीय मंत्रिमंडळाने व्यक्त केला आहे.





