
दैनिक स्थैर्य । दि. २३ जून २०२२ । नवी दिल्ली । युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिका, युरोप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या निशाण्यावर आलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी जागतिक मुत्सद्देगिरी मोडीत काढण्याची मोठी खेळी खेळलीय. एकीकडं पुतीन यांनी भारत आणि चीनमधील कंपन्यांसाठी रशियन बाजारपेठ अधिक खुली करण्याची ऑफर दिलीय, तर दुसरीकडं ब्रिक्स देशांमार्फत इतर विकसनशील देशांना आपलं तेल आणि वायू पुरवणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश असलेल्या ब्रिक्स व्यापार फोरमला पुतीन संबोधित करत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या फोरमला संबोधित केलंय. भारत चालू वर्षात 7.5 टक्के विकास दर गाठून जगातील सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था राहील. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी ज्याप्रकारे आपल्या देशाची आर्थिक क्षमता मांडलीय, त्यावरून हे स्पष्ट होतं की, चीनसोबतचे संबंध ताणले असले तरी, भारताचे आर्थिक हितसंबंधही ब्रिक्सशी जोडलेले आहेत. आज 23 जूनपासून ब्रिक्सच्या प्रमुख नेत्यांची शिखर परिषद सुरू होणार आहे. शिखर परिषदेपूर्वी बिझनेस फोरमची बैठक झालीय.
भारतात रशियन तेलाची निर्यात वाढली
अमेरिका आणि युरोपीय निर्बंधांना न जुमानता चीन आणि भारत रशियाकडून अधिक क्रूड आणि गॅस खरेदी करत असल्याच्या वृत्तात पुतीन यांनी आपल्या भाषणात सांगितलं की, या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत रशियाचा ब्रिक्स देशांसोबतचा व्यापार 38 टक्क्यांनी वाढून 45 अब्ज डॉलरवर पोहोचलाय. रशियातून चीन आणि भारताला तेल व वायूच्या निर्यातीत मोठी वाढ झालीय. भारतातील रिटेल चेन कंपन्यांचा रशियामध्ये विस्तार करण्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत.
रशियन कंपन्यांचा भारतात विस्तार
रशियन आयटी कंपन्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेत विस्तारत आहेत. रशिया आपली बँकिंग वित्तीय व्यवस्थापन प्रणाली ब्रिक्स देशांच्या बँकांशी जोडण्यास तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ब्रिक्स देशांच्या चलनांसाठी स्वतंत्र राखीव ठेवण्याचाही रशिया विचार करत आहे. रशिया आपली तेल आणि वायू निर्यात ब्रिक्स देशांद्वारे इतर विकसनशील देशांमध्ये हलवण्यास तयार आहे.
अर्थव्यवस्था सुधारण्यावर अधिक भर
फोरमला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या कालावधीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेत झालेल्या सुधारणेसाठी चार तथ्ये सांगितली. पहिली म्हणजे, सध्याची आर्थिक प्रगती तंत्रज्ञानावर आधारित आहे. देशात शंभरहून अधिक युनिकॉर्न ($1 बिलियन पेक्षा जास्त उलाढाल असलेल्या नवीन कंपन्या) आणि 70 हजार स्टार्टअप्स आहेत. दुसरं म्हणजे, भारत व्यवसायाचं वातावरण सतत सुधारत आहे. तिसरं, पायाभूत सुविधा क्षेत्रात झपाट्यानं प्रगती होत आहे आणि नवीन प्रकल्प राबवले जात आहेत. चौथे, डिजिटायझेशन जितक्या वेगानं होत आहे, तितक्या वेगानं जगात इतरत्र कुठेही होत नाही. ब्रिक्स देशांच्या स्टार्टअप्समध्ये सतत संवाद साधण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिलाय.