‘जातपीळ’ कादंबरीचे प्रकाशन

जयवंत भिसे अण्णाभाऊंचे साहित्यिक वारस - डॉ. श्रीपाल सबनीस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २८ जानेवारी २०२४ | सातारा |
जयवंत भिसे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा वारसा सांगणारे व जातीअंताचे स्वप्न पाहणारे विवेकवादी, सच्चे आंबेडकरवादी लेखक आहेत, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते जयवंत भिसे यांच्या ‘जातपीळ’ कादंबरीचे प्रकाशन संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने येथील नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर झिंब्रे होते. विचार मंचावर संस्कृती प्रकाशनच्या प्रकाशक व पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ, लेखक जयवंत भिसे, संबोधी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रमेश इंजे, कार्यवाह अ‍ॅड. हौसेराव धुमाळ, कोषाध्यक्ष केशवराव कदम उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते लेखक जयवंत भिसे व त्यांच्या पत्नी शीला यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ कवी, साहित्यिक प्रमोद कोपर्डे व प्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे प्रतिनिधी शिरीष चिटणीस यावेळी उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे किशोर बेडकिहाळ म्हणाले, जयवंत भिसे यांच्या रूपाने मराठी साहित्याला चांगला कादंबरीकार मिळाला आहे. त्यांची कादंबरी पहिलीच असली तरी तसे कुठेही जाणवत नाही. आजच्या काळात सामान्य माणसांच्या जगण्याचे प्रश्न तीव्र झाले आहेत. त्यावर आता त्यांनी पुढील कादंबरी लिहावी.

डॉ. श्रीपाल सबनीस आपल्या भाषणात पुढे म्हणाले, जयवंत भिसे यांची ‘जातपीळ’ ही कादंबरी उत्तम कलाकृती आहे. जात अस्मिता, ग्रामीण वास्तवाचे सूक्ष्म आकलन व मानवी प्रवृत्ती आणि स्वभावाचे उत्तम निरीक्षण यामुळे ही कादंबरी प्रभावी झाली आहे. बहुतांश लेखक कळत-नकळत जातीपातीचे व जात जाणिवेचे बळी पडलेले दिसून येतात. लेखकांनी मानव मुक्तीची व्यापक भूमिका घेऊन लेखन करण्याची गरज आहे. माणूस व कर्मठ समाजही बदलू शकतो, या परिवर्तनावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणेच जयवंत भिसे यांचा विश्वास आहे. म्हणूनच त्यांनी शोषणमुक्त मानवतेचे, जातीअंताचे स्वप्न ‘जातपीळ’ कादंबरीत समर्थपणे रंगवले आहे.

त्यांनी मराठा समाजातील विधवा स्त्रीला कादंबरीची नायिका केले आहे. ते मराठी साहित्यात नवीन आहे. त्यांनी सुस्ट आणि दुष्ट प्रवृत्तीच्या दोन पाटलांतील संघर्ष रंगवला आहे. विश्वास पाटील यांच्यासारख्या लेखकाकडूनही मराठी साहित्यात अशा प्रकारचे चित्र अद्याप आलेले नाही.

सुनिताराजे पवार म्हणाल्या, महात्मा फुले व केशवराव विचारे गुरूजी यांच्या सत्यशोधक समाजाच्या विचाराच्या प्रेरणेचे बीज लाभल्याने ‘जातपीळ’ कादंबरी सरस ठरली आहे. मराठी वाचक, समीक्षक तिचे चांगले स्वागत करतील.

दिनकर झिंब्रे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे समताधिष्ठीत समाज निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले. तसेच जातीअंताच्या परिवर्तनाचे स्वप्नरंजन लेखक जयवंत भिसे यांनी ‘जातपीळ’मध्ये रंगवले आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या ‘फकिरा’ कादंबरीची आठवण करून देण्याचे सामर्थ्य या कादंबरीमध्ये आहे.

रमेश इंजे यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. हौसेराव धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. केशवराव कदम यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व श्रोत्यांनी हॉल भरगच्च झाला होता.


Back to top button
Don`t copy text!