स्थैर्य, भंडारा, दि. २२: जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून मृत्यूच्या प्रमाणातदेखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रुग्णांच्या उपचारासाठी खाटांची संख्या कमी पडत असून गरजू रुग्णास तात्काळ बेड उपलब्ध करुन द्या, असे निर्देश पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी प्रशासनाला दिले.
जिल्हा परिषद सभागृहात आयोजित बैठकीत कोविड 19 बाबत आढावा घेतांना ते बोलत होते. आमदार अभिजित वंजारी, नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शेखर नाईक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
कोविड रुग्णांना शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात बेडसाठी प्रतिक्षा करावी लागते ही बाब गंभीरतेने घेऊन तात्काळ बेडची व्यवस्था करावी. जिल्ह्यात मुंबईप्रमाणे रुग्णालयात व्यवस्थापन केल्यास रुग्णांची गैरसोय होणार नाही, असे डॉ. कदम यांनी सांगितले. भंडारा सामान्य रुग्णालयात प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात सुध्दा ऑक्सिजन बेडची व्यवस्था करा त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.
डॉक्टर व नर्सेसची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले. बरेचदा डॉक्टर व नर्सेस रुजू झाल्यानंतर दोन तीन दिवसातच नोकरी सोडून जातात त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. असे प्रकार होऊ नयेत म्हणून रुजू होते वेळी त्यांचेकडून करार लिहून घ्यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी कोविड लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. जिल्ह्याला 2 लाख 44 हजार डोस प्राप्त झाले असून 2 लाख 88 हजार डोस लसीकरणासाठी लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिली. लसीकरणात भंडारा जिल्हा पहिला असल्याचे त्यांनी नमूद केले.
आमदार अभिजित वंजारी, नरेंद्र भोंडेकर व राजू कारेमोरे यांनी जिल्ह्यातील कोविड संदर्भात बोलताना रुणांची होत असलेली गैरसोय यावर प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली. यावर पालकमंत्र्यांनी व्हेंटिलेटर व ऑक्सिजनची सुविधा असलेले बेड जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर तात्काळ व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या.
जिल्ह्यात 500 ते 800 ऑक्सिजन बेड असून बेडची संख्या वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सद्यपरिस्थितीत असलेल्या बेड पेक्षा अधिक बेड उपलब्ध असल्यास पुढील नियोजन करणे सोयीचे होऊन रुग्णांची गैरसोय होणार नाही. अडचण भासल्यास त्यावर तात्काळ मार्ग काढा, असेही ते म्हणाले. लवकरच याबाबतचे सर्व अधिकार जिल्ह्याला देणात येणार आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील सर्व अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना कोविड केअर सेटरमध्ये इंटर्नशिपसाठी नियुक्त करा. तसेच नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा त्यात समावेश करा म्हणजे आरोग्य विभागात मनुष्यबळाचा तुटवडा जाणवणार नाही, या दृष्टीने प्रयत्न करा, असे त्यांनी सांगितले. इतर वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स सोबतच होमिओपॅथीच्या डॉक्टरांचा समावेश कोविड केअर युनीटमध्ये करावा त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळ अधिक वाढेल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. याबाबत शासनस्तरावर पाठपूरावा करण्यात येईल. तसेच तांत्रिक अडचणी तात्काळ सोडविण्यासाठी शासनस्तरावरुन लागणाऱ्या परवानग्या तात्काळ देण्यात येतील, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
शासकीय व खाजगी रुग्णालयांनी रुग्णांची गैरसोय होणार नाही, याकडे प्राधान्याने लक्ष दयावे. ऑक्सिजनचा साठा मर्यादित असून त्याचा वापर योग्य रितीने कसा होईल यावर डॉक्टरांनी लक्ष केंद्रीत करावे. त्याबाबत प्रोटोकॉल घालून देण्याच्या सूचना डॉ. कदम यांनी यावेळी दिल्या. ग्रामीण स्तरावर याबाबत काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
तद्नंतर त्यांनी वरठी येथील सनफ्लॅग उद्योगातील ऑक्सिजन प्लँटला भेट देऊन पाहणी केली. तसेच ऑक्सिजन उपलब्धतेबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.