
दैनिक स्थैर्य । 21 मे 2025 । फलटण । केमिकल रेसिड्यू फ्री शेतमाल उत्पादन करणाऱ्या व वनस्पतीजन्य कीटकनाशकांच्या निर्मितीमध्ये अग्रणी असलेल्या के.बी. बायो ऑरगॅनिक्स आणि के.बी. एक्सपोर्ट कंपनीला माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राज्यसभा खासदार शरद पवार यांच्या सहपरिवाराने सोमवारी भेट दिली. या भेटीदरम्यान के.बी. उद्योग समूहाच्या आधुनिक प्रयोगशाळा आणि संशोधन प्रक्रियांचा शरद पवारांनी सखोल आढावा घेतला व कंपनीच्या कार्याची प्रशंसा केली.
खासदार शरद पवार, त्यांच्या पत्नी सौ. प्रतिभाताई पवार यांच्यासोबत विविध मान्यवरांनी कंपनीच्या उत्पादन युनिट्सची बारकाईने पाहणी केली आणि कृषी क्षेत्रात रासायनिक कीटकनाशकांपासून मुक्त, विषमुक्त व सेंद्रिय शेतीला चालना देणाऱ्या या उद्योग समूहाच्या प्रयत्नानांचे कौतुक केले. कंपनीचे संचालक सचिन यादव आणि सुजाता यादव यांनी यावेळी खासदार शरद पवारांचे स्वागत केले आणि कंपनीच्या वाटचालीवर आधारित माहितीपूर्ण सादरीकरण त्यांनी केले.
१९६२ मध्ये भारतात हरित क्रांती झाली. त्या काळात रासायनिक कीटकनाशकांच्या भरमसाठ वापरामुळे पर्यावरण व मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम झाले होते, तसेच निर्यातक्षम शेतमाल उत्पादनावरही विपरीत परिणाम झाला. या संकटाचा सामना करण्यासाठी के.बी. उद्योग समूहाने सेंद्रिय शेतीला प्राधान्य देत विषमुक्त उत्पादनांवर लक्ष केंद्रित केले आहे. शरद पवारांनी या सृजनशील आणि विज्ञानाधारित उपक्रमाला कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचे मानले.
शरद पवारांनी कंपनीच्या सत्कार समारंभात स्पष्ट केले की, “वनस्पतींच्या अल्कलॉइड्सपासून रसायनमुक्त कीटकनाशकांच्या निर्मितीत कंपनीने एक उल्लेखनीय योगदान दिले आहे. हा उपक्रम शेतकऱ्यांच्या भविष्याला नवा मार्ग दाखवणारा आहे व सर्व शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत आहे.” त्यांनी के.बी. उद्योग समूहाच्या आधुनिक प्रयोगशाळांचा विशेष कौतुक केले.
या भेटी दरम्यान, जैविक शेतीच्या जागतिक बाजारातील वाढत्या प्रभावावर, निर्यातक्षम जैविक उत्पादनांच्या संधींवर तसेच भारतातील शेतकऱ्यांच्या सामाजिक बांधिलकीवरही सविस्तर चर्चा झाली. के.बी. उद्योग समूहासाठी खासदार शरद पवारांची ही सहपरिवार भेट केवळ एक औपचारिकता नव्हे तर महाराष्ट्र व संपूर्ण देशात सेंद्रिय शेतीला चालना देणाऱ्या महत्त्वपूर्ण क्षणांपैकी एक मानली जात आहे.