मेडिक्लेम काढून करा स्वतःला सुरक्षित : डॉ. प्रसाद जोशी


परवाच एक तरुण जोडपे आले होते. त्या मुलाचे दोन्ही खुब्याचे सांधे दुखत होते गेले २ महिन्यांपासून. लग्न होऊन जेमतेम ६ महिनेच झाले होते. दोघांनी नुकताच व्यवसाय सुरू केला होता. तपासल्यानंतर असे लक्षात आले की त्याचे (मुलाचे) दोन्ही खुबे रक्त पुरवठा खंडित झाल्या मुळे खराब झाले आहेत आणि ते स्टेज ४ मध्ये आहेत. अशा वेळी संधेरोपण शस्त्रक्रिया करून खूबे बदलणे हाच पर्याय होता. तसे त्याला सांगितले व खर्चाचा अंदाज देण्यात आला. दोन्ही खुबे अगदी चांगल्या दर्जाचे टाकले तर बजेट साधारण ५ ते ६ लाखाच्या घरात जाणार होते. मेडिक्लेमचा इन्शुरन्स आहे का ? असे विचारण्यात आल्यावर
तो नाही असे उत्तर आले.

लग्नानंतर नुकताच सुरू केलेला व्यवसाय, कर्ज काढून घातलेले भांडवल आणि आता हा मोठा खर्च ! दोघांचे चेहरे कावरे बावरे झाले. एक मोठे प्रश्नचिन्ह दोघांच्या डोळ्यात मला दिसले ! ऑपरेशन नाही केले तर त्रास वाढत जाणार होता, चालणेच मुश्किल होऊन बसणार होते. त्याचा परिणाम व्यवसायावर होणार होता.

मेडिक्लेम आधीच केला असता तर हे सर्व प्रश्न चुटकी सर्शी सुटले असते. अशी बरीच उदाहरणे मी तुम्हाला देऊ शकतो.

आपण मरणोत्तर आपले कुटुंब अडचणीत येऊ नये म्हणून लाईफ इन्शुरन्स सगळेच काढतो. पण जिवंत असताना अचानक मेडिकलचा मोठा खर्च आला तर त्याची तरतूद कोठे करतो ? एकदा गंभीरतेने विचार करून बघा. कारोनाच्या काळात हा अनुभव आपल्या सगळ्यांनाच आला आहे.

“मेडिक्लेम घेणे ही काळाची गरज आहे”

सध्याच्या  युगात आयुर्मान जरूर वाढलेले आहे. पण उत्तम जगण्याचा दर्जा नक्कीच घटत चाललेला आहे. सगळेच आजार आता तरुण वयात येताना दिसत आहेत.

स्थूलता (जाडपणा), डायबेटीस, बीपी, हायपरटेन्शन, ऑस्टियोआर्थरायटिस, थायरॉईड रोग, अँकिलोझिंग स्पॉन्डिलायसिस, मान व कंबर दुखी आणि असे बरेच आजार २०-३० या वयातच जडत आहेत. याला आपणच जबाबदार आहोत. आपली जीवन शैलीच याला पूर्णपणे जबाबदार आहे. आपण म्हातारपणी आपले आयुष्य सुखाचे जावे म्हणून पेन्शन प्लॅन घेतो, पण चालू आयुष्य निरोगी ठेवण्याचे किती प्रामाणिक प्रयत्न करतो ते जरा तपासून पाहा. आणि मग जर ते करत नसू तर आजार होणारच आहेत हे पक्के लक्षात असुदेत. सध्या मेडिकलची ट्रीटमेंट कॉस्ट प्रायव्हेट हॉस्पिटल्स मध्ये प्रचंड वाढली आहे. क्वालिटी ट्रीटमेंट घ्यायची असेल तर खिसा रिकामा होणारच आहे.

तंत्रज्ञानाच्या ह्या युगात एक ५० बेड सुसज्ज हॉस्पिटल उभे करायचे झाले तर त्यासाठी कमीत कमी ५० कोटी इतके भांडवल लागते. मग साहजिकच ट्रीटमेंट कॉस्ट वाढणारच. ह्या सर्व चक्रातून सुटायचे असेल तर एकतर आजार होऊच देऊ नका ! नाहीतर मेडिकल चा खर्च  मेडिक्लेमनी सिक्युअर करा. पण याचा असा अर्थ नाही की कसेही जगा, मेडिक्लेम पॉलिसीमध्ये लिमिट वर खर्च गेला तरीही पंचाईतच होणार हे नक्की…

१. मेडिक्लेम पॉलिसी कशी असावी :

सध्या बऱ्याच प्रायव्हेट कंपन्या मेडिक्लेम पॉलिसी घेऊन बाजारात उपलब्ध आहेत. पॉलिसी ही कॅशलेस असावी. म्हणजेच एखाद्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट साठी ऍडमिट झालात तर पूर्ण खर्चाची जबाबदारी हॉस्पिटलची असते. ते हॉस्पिटल त्या कंपनी ला टायअप असते आणि ट्रीटमेंट साठी लागणारा संपूर्ण खर्च (पॉलिसीच्या लिमिट मध्ये असल्यास) हॉस्पिटल कंपनी कडून मिळवते. पेशंट ला त्या खर्चाचा भुर्दंड पडत नाही.

जर ते हॉस्पिटल त्या कंपनी शी टायअप नसेल आणि तुम्हाला तिथेच (त्याच हॉस्पिटल मध्ये) ट्रीटमेंट घायची असेल तर मग पॉलिसी कंपनीच्याकडून पुन्हा पैसे परत मिळवण्याचा ऑप्शन निवडावा लागतो. म्हणजेच तुम्हाला होणाऱ्या ट्रीटमेंटचा सर्व खर्च तुमच्या खिशातून भरावा लागतो आणि मग कंपनी कडून तो परत मिळवावा लागतो. ह्यात दोन तोटे आहेत. पहीला म्हणजे तुम्हाला आधी खर्च करावा लागतो आणि दुसरा म्हणजे तो परत मिळवावा लागतो ज्यासाठी बरेच वेळ जावू शकतो.

 २. TPA म्हणजे काय ? आणि कुठली कंपनी अधिक चांगली ?

TPA म्हणजेच Third Party Assistance, म्हणजेच ती कंपनी जी प्रत्यक्षात तुम्हाला पैसे देणार आहे. भारतात United India Insurance, New India Insuarance, Oriental India Insuarance अशा बऱ्याच संस्था आहेत की ज्या डायरेक्ट पॉलिसी घेतात पण ते स्वतः पॉलिसी धारकाला पैसे देत नाहीत. ह्या कंपन्या TPA ची मदत घेऊन त्यांच्या मेडिक्लेम सेटल करतात.

मग डायरेक्ट TPA कडे का जाऊ नये ? असा ही प्रश्न तुमच्या मनात येईल. अगदी बरोबर आहे. कॉर्पोरेट पॉलिसीज शक्यतो वरील तीन पैकी असतात आणि त्या मग TPA शी टायअप करून घेतात.

३. कुठला TPA चांगला ?

पॉलिसी घेताना रेकॉर्ड तपासणे फार महत्त्वाचे आहे. ती कंपनी किती वर्ष जुनी आहे?, त्याचे ट्रॅक रेकॉर्ड कसे आहे ?, त्यांनी आत्ता पर्यंत किती क्लेम हसलफ्री सेटल केले आहेत ? हे बघणे गरजेचे आहे.

बाजारात जवळ पास १०० एक कंपन्यांचे मेडिक्लेम पॉलिसीज आहेत. पण त्यात STAR health, Mediassist, MD India, ICICI Lombard , Bajaj Allianz, Health India, Religare, HDFC ergo, Tata AIg , Future Generale, Paramount ह्या कंपन्या जास्त प्रचलित आहेत आणि त्यांचे क्लेम सेटलमेंटचे ट्रॅक रेकॉर्ड उत्तम आहे .

४. Policy किती लाखांची असावी ?

कमीत कमी १० लाखांची असावी . कारण सध्या ट्रीटमेंट जास्त वेळ घ्यावी लागली किंवा आजार मोठा असेल तर त्या ट्रीटमेंटचा खर्च ही खूप मोठा असतो . त्यातून कॅन्सर असेल तर १० लाख सुद्धा कमी पडू शकतात.

५. सगळे आजार लगेच कव्हर होतात का ?

सर्व प्रथम या भ्रमात राहू नका की पॉलिसी काढली की लगेच सर्व आजार कव्हर होतात. पूर्वीचा किंवा आधीचा जर काही आजार असेल आणि तो तुम्ही पॉलिसी करताना दाखवला नाही आणि नंतर असे लक्षात आले की तो आजार जुना आहे (सत्य कधीच लपत नाही, ते केव्हा ना केव्हा तरी बाहेर येतेच) तर तुमची पॉलिसी रद्दबातल होऊ शकते.

पॉलिसी झाल्या नंतर पहिल्या वर्षी छोटे आजार जसे की ताप, थंडी, जुलाब, उलट्या एवढेच कव्हर मिळते. दुसऱ्या वर्षी लहान ऑपरेशन्स जसे की हर्निया, अपेंडिक्स, हायड्रोसील, पित्ताशय अशी कव्हर असतात.

तिसऱ्या वर्षी पासून सर्व मोठे आजार आणि पॉलिसीच्या लिमिट मध्ये बसत असलेला कोणताही आजार आणि त्याची ट्रीटमेंट कव्हर होते.

Accident cover हे पहिल्या दिवसापासून पासून  चालू होते. त्यामुळे ज्यांची पॉलिसी नुकतीच काढली आहे आणि अपघात होऊन हाड मोडले असेल तर काळजी करू नका, ते पॉलिसी मध्ये पूर्ण कव्हर असते.

पॉलिसी रुजू करून घेताना एजंट तुम्हाला ही सर्व माहिती देतीलच असे नाही. अगदी छोट्या अक्षरात ह्या टर्म्स आणि कंडिशन्स लिहिलेल्या असतात ज्या उत्तम दृष्टी असलेल्या माणसाला सुद्धा दिसत नाहीत आणि आपण बिनधास्त कोऱ्या फॉर्म वर काहीही न वाचता सही करून देतो.

६. साधारण प्रीमियम किती असतो ?

१० लाखाची पॉलिसी केलीत तर त्याचा साठ वयाच्या च्या आत असाल तर अंदाजे एक वर्षासाठी १० ते १५ हजार इतका असतो. आपण हिशोब काढला तर ह्यापेक्षा कित्येक जास्त पैसे आपण एकावर्षात आपल्या आरोग्यासाठी खर्च करतो. ४०शी च्या आत असाल तर प्रीमियम अजून कमी पडतो आणि ६० च्या वर असाल तर तो नक्कीच जास्त पडतो. ७० वयानंतर सहसा पॉलिसी निघत नाही .

मेडिक्लेम पॉलिसी बद्दल काही ठळक मुद्दे:

  • मेडिक्लेम पॉलिसी असणे ही काळाची गरज आहे.
  • ती (मेडिक्लेम पॉलिसी)किमान १० लाखाची नक्की असावी.
  • पॉलिसी घेताना TPA कंपनी चे ट्रॅक रेकॉर्ड बघूनच घ्यावी अन्यथा डोकेदुखी होऊ शकते.
  • जेवढ्या कमी वयात ती काढाल तेवढा प्रीमियम कमी पडतो. ७० वयानंतर कुठलीच कंपनी mediclaim पॉलिसी उतरवत नाही.
  • सर्व मोठे आजार हे चौथ्या वर्षा नंतर पूर्णपणे कव्हर होतात ,त्याआधी कोणीही कितीही सांगो ते नक्कीच कव्हर होत नाहीत.
  • सर्वात शेवटचे आणि महत्त्वाचे मेडिक्लेम पॉलिसी ही भविष्यातील आपल्याच आजारांसाठीची सुरक्षा आहे हे पक्के लक्षात ठेवा , त्यातून returns ची अपेक्षा करू नका.

तर चला मग प्रियजनहो,

काढून मेडिक्लेम पॉलिसी करा आपले आरोग्य सुरक्षित, माहिती घेऊन उचला योग्य पाऊल ,नका राहू या बद्दल अशिक्षित!

– डॉ प्रसाद जोशी,

अस्थिरोग शल्य- चिकित्सक,

जोशी हॉस्पिटल प्रा..ली.. फलटण.


Back to top button
Don`t copy text!