स्पर्धेच्या युगामध्ये मोबाईलचा योग्य वापर गरजेचा : प्राचार्य डॉ. शेख


दैनिक स्थैर्य । दि. 03 जानेवारी 2024 । फलटण । स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर विविध कौशल्ये हि आत्मसात केली पाहिजेत. मेंदू विकसित करून मोबाईलचा वापर योग्य कारणासाठी करावा. त्यातील योग्य बाबी घेतल्या तर जीवन सुखकर होईल. आयुष्यात पुढे जाण्यासाठी योग्य क्षेत्राची निवड करून आवड, निवड व सवड जोपासली पाहिजे. पारंपरिक शिक्षणाबरोबरच तांत्रिक, वैद्यकीय, वैद्यकीय पूरक, अभियांत्रिकी, गणवेशधारी, कृषी याचेही शिक्षण घेऊन आपला उत्कर्ष साधावा. आपण आपला दृष्टिकोन निकोप ठेवून व्यवसायाची निवड करावी; यासाठी मुलांनी चौकस असले पाहिजे असे मत कर्मवीर भाऊराव पाटील पॉलिटेक्निक साताराचे प्राचार्य डॉ. के. सी. शेख यांनी रयत शिक्षण संस्थेचे, श्री जितोबा विद्यालय जिंती तालुका फलटण येथे व्यवसाय मार्गदर्शन शिबिरात व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ. विद्या शिंदे होत्या तसेच समुपदेशक ताराचंद्र आवळे, प्रा. येवले एस. एस., प्रा. भुजबळ एम. डी., प्रा. भोईटे के. पी. यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्राचार्य डॉ. शेख पुढे म्हणाले की; मुलांनी सकारात्मक विचाराने आदर्श जीवन जगण्याची कला अवगत केली पाहिजे. त्यांना हे असेच का ? तसेच का ? असे प्रश्न पडले तर त्यांची विचार प्रक्रिया योग्य दिशेने जाईल. योग्य करिअर निवडून समाधानाने जिवन जगतील.

मुख्याध्यापिका सौ. विद्या शिंदे म्हणाल्या की; इच्छाशक्ती जागृत ठेवून कार्यप्रवण राहिल्यास यशस्वी जीवन जगता येते. कौशल्ये आणि इच्छा याची सांगड घालून शिक्षण घेतल्यास यशाचा मार्ग खुला होतो.

प्रा. भुजबळ एम. डी. यांनी अभियांत्रिकी क्षेत्राची माहिती सांगून त्यातील करिअरच्या संधी, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती याची सविस्तर माहिती दिली तसेच मुलींसाठी असणार्‍या नोकरीच्या संधी व केबीपी पॉलिटेक्निक वर्ये सातारा येथील मोफत शिक्षणाची सोय यावर भाष्य केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन समुपदेशक ताराचंद्र आवळे यांनी केले तर आभार समुपदेशक सौ. पौर्णिमा जगताप यांनी मानले.

यावेळी सौ गौरी जगदाळे, गजानन धर्माधिकारी तसेच इयत्ता नववी व दहावीचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!