प्रोग्रेसिव्ह स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा लक्षवेधी कलाविष्कार; विद्यार्थिनींना १,००० सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप

कोळकी येथील प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचा लक्षवेधी कलाविष्कार आणि विद्यार्थिनींना १,००० सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप हे विशेष आकर्षण ठरले.

स्थैर्य, कोळकी, दि. १९ ऑगस्ट : कोळकी (ता. फलटण) येथील सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेली देशभक्तीपर गीते, नाटके आणि मानवी मनोऱ्यांनी सर्वांची मने जिंकली, तर विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांचे लक्षवेधी सादरीकरण व सत्कार

ध्वजारोहणानंतर प्राचार्या सुजाता गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. आदिती गवारी हिने स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व विशद केले. दुर्गेश सोनवलकर, गार्गी बळीप, तन्वी पोळ आणि रियांश पायसोडे या लहान विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या कार्यावर मनोगत व्यक्त केले. माध्यमिक विभागाच्या विद्यार्थिनींनी नारीशक्तीवर आधारित नाटिका आणि विद्यार्थ्यांनी पिरॅमिड प्रात्यक्षिके सादर केली. याच कार्यक्रमात दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थी आणि १०० टक्के उपस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

मान्यवरांचे मार्गदर्शन आणि विशेष सन्मान

प्राचार्य रवींद्र येवले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना हे विद्यार्थी उद्याचा बलशाली भारत घडवतील, असा विश्वास व्यक्त केला. नीलम पाटील यांनी विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी १,००० सॅनिटरी नॅपकिन्सचे बॉक्स भेट दिले. संचालिका संध्या गायकवाड यांनी ‘सायकॉलॉजी ऑफ कंट्रोल’ या इंग्रजी पुस्तकाचे लेखन करणाऱ्या आर्यन भोसले या माजी विद्यार्थ्याचे विशेष अभिनंदन केले. याप्रसंगी प्रीतम पाटील, उपसरपंच अशोक नाळे, राजकुमार काकडे, विकास शिंदे, शिवाजी भुजबळ आणि मनोज पवार उपस्थित होते. अमृता गोसावी यांनी सूत्रसंचालन केले, तर तेजश्री बळीप यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Back to top button
Don`t copy text!