प्रशासक राजवटीत फलटणच्या रस्त्यांचा ‘बट्ट्याबोळ’? प्रीतसिंह खानविलकरांच्या आत्मदहनाच्या इशाऱ्याने प्रशासन जागे; प्रभाग ८ मधील ‘भ्रष्टाचाराचा’ पंचनामा!


फलटण नगरपरिषदेवर प्रशासक असताना रस्ते कामांत झालेला सावळागोंधळ चव्हाट्यावर. सामाजिक कार्यकर्ते प्रीतसिंह खानविलकर यांच्या आत्मदहनाच्या इशाऱ्याने यंत्रणा हलली. प्रभाग ८ मधील ८ रस्त्यांची झाली पाहणी; ‘डबल निविदा’ घोटाळा आणि कागदोपत्री प्रगतीचा बुरखा फाडला. वाचा सविस्तर…

स्थैर्य, फलटण, दि. ३१ जानेवारी : फलटण नगरपरिषदेवर प्रशासक नियुक्त असताना शहराच्या विकासाला गती मिळण्याऐवजी कारभारात सुसूत्रतेचा अभाव आणि भ्रष्टाचाराला मोकळे रान मिळाल्याचे चित्र समोर आले आहे. प्रशासक राजवटीत अधिकारी आणि ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे शहरातील रस्ते कामांचा बट्ट्याबोळ झाला असून, याविरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रीतसिंह खानविलकर (Pritsingh Khanvilkar) यांनी पुकारलेल्या एल्गारामुळे प्रशासन अखेर नमले आहे. खानविलकर यांनी दिलेल्या आत्मदहनाच्या थेट इशाऱ्यामुळे सुस्त प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून, मंगळवारी प्रभाग क्रमांक ८ मधील रखडलेल्या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यास अधिकाऱ्यांना भाग पाडण्यात आले.

प्रशासक काळात कागदी घोडे नाचवले?

नगरपरिषदेचा कार्यकाळ संपल्याने प्रशासक नियुक्त करण्यात आले होते. मात्र, या काळात पारदर्शक कारभाराची अपेक्षा फोल ठरली आहे. नगरपरिषद प्रशासन, ठेकेदार आणि फाईलमधील खोट्या प्रगती अहवालांच्या (Progress Report) संगनमतामुळे नागरिकांचे हाल होत असताना प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधली होती. मात्र, २६ जानेवारी रोजी प्रीतसिंह खानविलकर यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला तातडीने हस्तक्षेप करावा लागला. त्यांच्या आदेशानुसार नगरपरिषदेचे अभियंते श्री. गायकवाड व श्री. प्रतीक जाधव यांना प्रत्यक्ष जागेवर उतरून पाहणी करावी लागली.

८ रस्त्यांचे वास्तव: कागदोपत्री ‘ओके’, प्रत्यक्षात ‘खड्डे’!

या पाहणीत प्रशासक काळातील भोंगळ कारभार उघड झाला. गजानन चौक, जुने बोर्डिंग, ह. बा. कुलकर्णी घर ते रवी शिंदे गिरण, जय हिंद कोल्ड्रिंक्स ते डॉ. जगताप दवाखाना यांसह तब्बल ८ प्रमुख रस्त्यांची कामे वर्षानुवर्षे अपूर्ण असल्याचे पुराव्यानिशी समोर आले. फाईलमध्ये ‘काम पूर्ण’ किंवा ‘प्रगतीपथावर’ दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांची पाहणीदरम्यान बोलती बंद झाली.

‘डबल निविदा’ घोटाळा: ठेकेदाराचे चांगभलं!

या पाहणीतील सर्वात धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे ‘डबल निविदा’ प्रकार. ह. बा. कुलकर्णी ते रवी शिंदे गिरण या एकाच रस्त्यासाठी दोन वेगवेगळ्या नावांनी निविदा काढून ठेकेदाराला आर्थिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप खानविलकर यांनी प्रशासनासमोर पुराव्यासह केला. प्रशासक राजवटीत कोणाचेही नियंत्रण नसल्यानेच असे प्रकार घडल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

कारवाई फक्त कागदावरच?

संबंधित ठेकेदाराला तीन वेळा नोटीस बजावण्यात आली, त्याला काळ्या यादीत (Blacklist) टाकण्याचे आदेशही निघाले; तरीही त्याला कोणाचे पाठबळ मिळत होते? प्रशासन नेमकं कोणासाठी काम करतंय? असा थेट सवाल खानविलकर यांनी उपस्थित केला आहे. १५ ऑगस्ट २०२५ रोजी अमरसिंह भाऊसाहेब खानविलकर यांच्या उपोषणावेळी दिलेल्या लेखी आश्वासनांनाही प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याचे यावेळी निदर्शनास आले.

“न्याय मिळेपर्यंत माघार नाही”

केवळ पाहणी करून आणि पंचनामे करून पळ काढायचा असेल, तर ही लढाई अजून पेटेल. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही आणि रस्ते पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत माघार घेणार नाही,” असा स्पष्ट इशारा प्रीतसिंह खानविलकर यांनी दिला आहे. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि पुराव्यांच्या भडिमारामुळे उपस्थित अधिकाऱ्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती.


Back to top button
Don`t copy text!