पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोणंद रेल्वे स्थानकाचे लोकार्पण

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । 22 मे 2025 । पुणे । प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे गुरुवारी (दि. २२ मे) पुणे विभागातील लोणंद व केडगावसह राज्यातील १५ अमृत स्थानकांचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली रेल्वे मंत्रालयाने डिसेंबर २०२२ मध्ये ‘अमृत भारत स्थानक’ योजना सुरू केली होती.

‘अमृत भारत स्थानक’ योजनेअंतर्गत, देशभरातील १ हजार ३०९ स्थानकांचे आधुनिकीकरण करून त्यांना आधुनिक, एकात्मिक वाहतूक केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले गेले आहे. पंतप्रधान यांनी पहिल्यांदा ६ ऑगस्ट २०२३ आणि नंतर २६ फेब्रुवारी २०२४ अशा दोन टप्प्यांमध्ये या स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली होती. या योजनेअंतर्गत रेल्वे स्थानके दीर्घकालीन विकास, बहुआयामी एकात्मिकीकरण, दिव्यांगजनांसाठी वाढीव सुविधा, शाश्वततेमध्ये सुधारणा आणि शहरी केंद्र म्हणून भविष्याच्या दृष्टीने सज्ज असलेल्या रेल्वे स्थानकामध्ये परावर्तीत करण्यावर भर दिला गेला आहे.

आता या योजनेअंतर्गतचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून, उद्या २२ मे २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय रेल्वेच्या १०३ पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे उद्घाटन करणार आहेत. यात महाराष्ट्रातील १५ प्रमुख रेल्वे स्थानकांचाही समावेश आहे. ही स्थानके अत्याधुनिक प्रवासी अनुकूल सुविधांनी अद्ययावत करण्यात आली, या सगळ्यासाठी एकत्रितपणे १७५ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च केला गेला आहे.

यात महाराष्ट्रातील १५ रेल्वे स्थानकांचा समावेश असून पुणे विभागातील केडगाव (ता. दौंड, जि. पुणे) आणि लोणंद (ता. खंडाळा, जि. सातारा) या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २६ फेब्रुवारी २०२४ रोजी या दोन्ही स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पाची पायाभरणी केली.

लोणंद स्थानकावरील प्रवासी सुविधा उन्नतीकरण

एकूण प्रकल्प खर्च १० कोटी ४८ लाख रुपये आहे. या स्थानकावर प्रवाशांची सोय, सुरक्षितता लक्षात घेऊन प्रवासाचा दर्जा सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण विकासकामे करण्यात आली आहेत.

प्रवासी संपर्क आणि प्रवेश : आधुनिक तिकीट खिडक्यांसह रांगेसाठी पुरेशी जागा असलेले नवीन तिकीट कार्यालय, स्वतंत्र प्रवेश/निर्गमन मार्गासह सुधारित परिसर रचना

फलाट सुविधा : फलाटाचा सुधारित पृष्ठभाग ऊनपावसापासून संरक्षणासाठी सीओपी छताचा विस्तार, नवीन स्टील व ग्रॅनाइट बाक, एलईडी दिवे व पंखे लावल्यामुळे ऊर्जेचा कार्यक्षम वापर

पाणी व स्वच्छता : फलाटावर पिण्याच्या पाण्याची सुविधा, शुल्क भरून वापरण्याची स्वच्छतागृहे, सर्व फलाटांवर दिव्यांगांना सोयीस्कर सुविधा

माहिती प्रणाली : अचूक व वेळेवर घोषणांसाठी (एनईटीएस आधारित) सार्वजनिक उद्घोषणा व्यवस्था रेल्वेगाडीच्या डब्यांसाठी मार्गदर्शनपर व फलाटावर दिशादर्शक फलक स्थानक परिसरात दिशादर्शक फलक

सौंदर्यीकरण व सुरक्षा : कलात्मक सजावटीसह प्रवेशद्वाराचे सौंदर्यीकरण फलाटावर व स्थानक परिसरात हिरवाई आणि वृक्षारोपण त्रिभाषिक फलक सौंदर्य व सुरक्षेसाठी नवीन ध्वजस्तंभ व उंच खांबावरील दिवे

अतिरिक्त सुविधा : सामान्य प्रवाशांसाठी प्रतीक्षालयाचे उन्नतीकरण योग्य अंतरावर कचरापेट्या वीजपुरवठा अखंड राहावा म्हणून इलेक्ट्रिक उपकेंद्र.

या स्थानकांचा पुनर्विकास ‘अमृत भारत स्थानक योजने’ अंतर्गत केला असून प्रवासानुभव, सहज प्रवेश व शहरी भागाशी एकात्मिकरण याने मोठे बदल घडून येत आहेत. पंतप्रधानांच्या आधुनिक, सर्वसमावेशक आणि प्रवासी-केंद्रित रेल्वे पायाभूत सुविधांच्या दृष्टीकोनाच्या पूर्ततेसाठी रेल्वे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!