मराठी साहित्य विश्वातील अनमोल रत्न : डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे


दोन दिवसांपूर्वी डॉ. विठ्ठल ठोंबरे यांच्या अकाली निधनाची धक्कादायक बातमी कानावर पडली आणि काही क्षण मन विषन्न झालं. बालपणीच आई-वडिलांचे छत्र हरपलेले डॉ. विठ्ठल ठोंबरे यांनी आयुष्यभर गरिबी कंठली. गरीबीचे चटके सोसतच त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी मराठी साहित्यातील एम. ए. पूर्ण करून ‘भारतीय लोकदैवत खंडोबा : एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावर पुणे विद्यापीठातून प्रा. डॉ. हार्डीकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी प्राप्त केली. आयुष्यभर अविवाहित राहून त्यांनी आपलं आयुष्य खंडोबाच्या चरणी समर्पित केलेलं होतं. याव्यतिरिक्त त्यांची ओळख एक थोर विचारवंत, संवेदनशील कवी, साहित्यिक, संशोधक, समीक्षक, पत्रकार, इतिहासाचा गाढा अभ्यासक व तळमळीचा सामाजिक कार्यकर्ता म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला होती. त्यांनी विविध विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. त्याचबरोबर अनेक ग्रंथांना प्रस्तावना लिहिली आहे.

जेजुरीच्या खंडोबावर तर त्यांनी तब्बल सतरा वर्षे अपार मेहनतीने संशोधन केलं. त्यासाठी या ध्येयवेड्या संशोधकाने अक्षरश: महाराष्ट्र उभा-आडवा पिंजून काढला. महाराष्ट्रातील सर्व कानाकोपर्‍यातील खंडोबाच्या देवस्थानांना त्यांनी भेटी दिल्या. यासाठी खिशात पैसा नसला तरी प्रसंगी शेतात मोलमजुरी केली. अशा पद्धतीने खंडोबाबद्दलची विविध प्रकारची (सुमारे सतराशे-अठराशे पानांचा ग्रंथ होईल एवढी) माहिती गोळा करून त्यांनी सुमारे साडेनऊशे पानांचा ‘आद्य महाग्रंथ : कुलदैवत खंडोबा’ हा संशोधनपर ग्रंथ लिहिला. त्यांच्या अभ्यासाचा आवाका बघून महाराष्ट्रभर गाजलेल्या ‘जय मल्हार’ मालिकेचे दिग्दर्शक व निर्माते महेश कोठारे यांनी त्यांची मालिकेसाठी तज्ञ सल्लागार म्हणून नियुक्ती केली. ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेचेही ते तज्ञ सल्लागार होते.

प्राचार्य रामदास डांगे यांनी संपादित केलेला ‘माणदेशी व इतर बोलींचा अभ्यास शब्दकोश खंड पहिला’चे ते सहसंपादक होते. तसेच श्री मार्तंड देवस्थान जेजुरीच्या वेबसाईटचे लेखन व संपादनाचे कामही त्यांनी केलेलं आहे. लोकसाहित्य, संतसाहित्य व दैवतशास्त्र म्हणजे ‘बा’ वर्गातील देवांचा (उदा. विरोबा, खंडोबा, जोतिबा इ. चा अभ्यास) या विषयाचे ते गाढे अभ्यासक होते. देवावर त्यांची अपार व नितांत श्रद्धा होती; परंतु ते अंधश्रद्धाळू कधीच नव्हते. राजकीय घडामोडींचेही ते अभ्यासक होते. डॉ. शिवाजीराव ठोंबरे लिखित ‘डोंगरपल्याड’ या कादंबरीचे त्यांनी साधारण १८ पानांचे दर्जेदार असं समीक्षन केलेलं आहे. ज्याची दखल अनेक विद्यापीठांमध्ये व परिषदांमध्ये घेतली गेली. नुकतीच त्यांनी ‘कृष्णाकाठचे भयपर्व’ ही बापू बिरू वाटेगावकर यांच्या जीवनावर आधारलेली व्यक्तीचित्रणात्मक कादंबरी लिहिली. त्यांना पाच राष्ट्रीय व एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे साहित्य क्षेत्रातील पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत.

डॉ. विठ्ठल ठोंबरे यांच्या रूपात मराठी मातीने एक विचारवंत, थोर साहित्यिक, संवेदनशील कवी, संशोधक, पत्रकार, समीक्षक, इतिहासाचा गाढा अभ्यासक व समाज सुधारणेसाठी अहोरात्र झटणारा तळमळीचा कार्यकर्ता गमावला आहे. मराठी साहित्याची, वंचित व उपेक्षितांसाठी सुरू असलेल्या सामाजिक चळवळीची ही अपरिमित हानी न भरून निघणारी आहे. त्यांच्या या अशा अकाली जाण्याने जेजुरीचा खंडोबाही धाय मोकलून रडला नसावा, तरच आश्चर्य!

थोडक्यात, डॉ. विठ्ठल ठोंबरे म्हणजे मराठी साहित्य विश्वाला पडलेलं एक गोड पण अपूर्ण स्वप्नंच होतं.

– प्रा. रवींद्र कोकरे


Back to top button
Don`t copy text!