प्रकाश मंडळाने सामाजिक बांधिलकी जपली : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले


 

स्थैर्य, सातारा, दि. ३१ : यंदा कोरोनाने सर्वच सण, उत्सव साजरे करण्यावर मर्यादा आल्या आहेत. गणेशोत्सवही यातून सुटलेला नाही. मात्र गणेशोत्सव सुंदर करण्यासाठी गेली अनेक वर्षे सहकार्य करणार्‍या मंडळींवर प्रथमच उपासमारीची वेळ आली. मानाचा गणपती असलेल्या प्रकाश मंडळाने अशा उपेक्षितांना केवळ आर्थिक मदतच नव्हे तर सत्कार करून एक नवा पायंडा पाडत सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

येथील शेटे चौकातील प्रकाश मंडळाने यंदा गणेशोत्सवात गेली अनेक वर्षे योगदान देणार्‍या बँडवाल्यांपासून कारागीर, छायाचित्रकार आदींना आर्थिक मदत देत केलेल्या सत्कारप्रसंगी आ. भोसले बोलत होते. यावेळी प्रकाश मंडळाचे सर्वेसर्वा श्रीकांत शेटे, अध्यक्ष विष्णू देवधर, माजी नगराध्यक्ष डॉ. अच्युत गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. अच्युत गोडबोले म्हणाले, आम्ही संस्कृती जपतो, आम्ही परंपरा टिकवतो या मंडळाच्या ब्रीदवाक्याप्रमाणे वागत मंडळाने खर्‍या अर्थाने संस्कृतीही जपली आहे आणि परंपराही टिकवली आहे.

सत्काराने भारावून गेलेले दरबार बँडचे आरिफ शेख म्हणाले, पुण्यासारख्या मोठ्या शहरात अनेक मोठी मंडळे आहेत. मात्र  त्यातील एकाही मंडळाने असा उपक्रम राबवलेला नाही. सातार्‍याच्या प्रकाश मंडळाने अडचणीच्या काळात केलेली मदत अत्यंत मोलाची आहे.

यावेळी आ.  भोसले यांच्या हस्ते 1994 पासून मंडळासाठी सेवा देणार्‍या दरबार बँडचे सारथ्य करणारे आरिफ शेख, 1989 पासून इलेक्ट्रिक डेकोरेशन करणारे वरदविनायक इलेक्ट्रिकलचे मनोज शेंडे यांचे कारागीर ओंकार रजपूत, पंकज परदेशी, सचिन आगुंडे, नंदलाल खुजूर, गेल्या 10 वर्षांपासून मिरवणुकीसाठी टॅ्रक्टर ट्रॉली उपलब्ध करून देणारे चांदवडी (भुईंज) येथील जगदीश शिंदे, गेली अनेक वर्षे मंडप व डेकोरेशनचे काम करणारे अस्लम शेख,  1989 पासून गणेशोत्सवातील सर्व कार्यक्रमांचे चित्रण करणारे किरण कलामंदिरचे उल्हास भिडे यांना सन्मापत्र, आर्थिक मदत व श्रीफळ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मंडळाच्या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.  सूत्रसंचालन अजय मुळे यांनी केले.  विष्णू देवधर यांनी आभार मानले. फिजिकल डिस्टन्सिंग पाळत हा कार्यक्रम पार पडला. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!