
दैनिक स्थैर्य । 18 जून 2025 । सातारा। जिहे कठापूर योजनेंतर्गत कृष्णा खोरे विकास महामंडळाने माण नदीवर बांधलेल्या बंधार्यांपैकी काही बंधारे दुरुस्तीला आले असून, पळशी, वरकुटेसह अनेक ठिकाणी बंधार्यांची डागडुजी करण्याची गरज निर्माण झाली आहे. काही ठिकाणी तर बंधाराच तुटला आहे.
कृष्णा खोरे विकास महामंडळाने माण नदीवर वीस वर्षांपूर्वी सव्वीस बंधारे बांधले होते. या बंधार्यांपैकी वरकुटे येथील काटकर वस्ती जवळील माण नदीवरील बंधारा यावर्षी प्रथमच उरमोडी, जिहे-कठापूर योजनेच्या सोडलेल्या पाण्याने भरला. तसेच दहिवडी भागात पडलेल्या पावसाच्या पाण्याने तुडुंब भरुन वाहिला. साधारणपणे माण नदीपात्रात अडीच किमीपर्यंत पाणी साठले वरकुटे, वाकी, माळवाडी या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा व नदीकिनारील शेतकर्यांचा शेतीपाण्याचा प्रश्न सुटला. बंधार्यावरुन माण नदीच्या पुराचे पाणी वाहिल्यामुळे बंधार्याचा स्लॅब अनेक ठिकाणी खचला आहे तर बंधार्याच्या संरक्षक भिंतीचेही स्लॅब निघाले आहेत. बंधार्याच्या
स्लॅबला संरक्षक रेलिंग केले नव्हते. त्यामुळे पूरपरिस्थितीत या बंधार्यावरुन ये-जा करणे धोक्याचे झाले आहे. अनेक शेतकर्यांची जमीन नदीपात्राच्या दोन्ही बाजूला असल्याने त्यांना दररोज बंधार्यावरुनच ये-जा करावी लागत आहे. पळशी येथील शेतकरी याच बंधार्यावरुन पाय घसरुन नदीपात्रात पडून वाहून गेला आहे. त्यामुळे या बंधार्याची दुरुस्ती व रेलिंगचे काम तातडीने करावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.
दहिवडी, गोंदवले खुर्द याठिकाणी नदीवर झालेल्या बंधार्यांना वीस वर्षे झाली आहेत. अनेक ठिकाणी बंधार्यांच्या डागडुजी करण्याची गरज आहे. बंधार्यांच्या फळ्या वेळेवर काढणे व बसवणे ही कामे होणे गरजेचे आहे; परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. माणगंगा नदीवरील 26 बंधार्यांची पाहणी करून जेथे दुरुस्तीची गरज आहे, त्याठिकाणी तातडीने दुरुस्त्या करणे गरजेचे आहे.