पोंभुर्ले ‘पुस्तकाचं गाव’ समृद्ध करून वाचनसंस्कृतीची ज्योत महाराष्ट्रभर प्रज्वलित करावी: रविंद्र बेडकिहाळ


आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या १८० व्या पुण्यतिथीनिमित्त पोंभुर्ले येथे आयोजित कार्यक्रमात रविंद्र बेडकिहाळ यांचे प्रतिपादन. ‘पुस्तकाचं गाव’ योजनेला महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संपूर्ण सहकार्य मिळणार.

स्थैर्य, फलटण, दि. 20 मे : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी, पोंभुर्ले (जि. सिंधुदुर्ग) येथे शासनाने ‘पुस्तकाचं गाव’ मंजूर केले आहे. ग्रंथालय आणि पुस्तक यांचा बाळशास्त्रींच्या जीवनाशी अत्यंत जवळचा संबंध होता. त्यामुळे त्यांच्या जन्मगावी ही योजना राबवण्याचा शासनाचा निर्णय दूरदर्शीपणाचा आहे. पोंभुर्ले गावात लावली जाणारी वाचनसंस्कृतीची ज्योत जर संपूर्ण महाराष्ट्रात प्रज्वलित करायची असेल, तर इथलं ‘पुस्तकाचं गाव’ अधिक समृद्ध झाले पाहिजे, असे विचार महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक व अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त केले.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या १८० व्या पुण्यतिथीनिमित्त पोंभुर्ले येथील ‘दर्पण’ सभागृहात आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी ‘माणूसकी फौंडेशन’चे अध्यक्ष प्रसाद मालपेकर, सचिव सुहास मालुसरे आणि सुधाकर जांभेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे’:

यावेळी मार्गदर्शन करताना रविंद्र बेडकिहाळ म्हणाले की, “आजच्या तरुण पिढीमध्ये वाचन कमी झाले असून वाचक पुस्तकाकडे येण्याचे प्रमाण घटले आहे. म्हणूनच आता पुस्तके वाचकांकडे जातील, यादृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे.” पोंभुर्ले गावात ‘माणूसकी फौंडेशन’ मार्फत शासनाकडून ही योजना राबवली जाणार असून, त्यासाठी ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’ सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच, बाळशास्त्रींच्या जीवनचरित्रावर सखोल संशोधन करून आपण त्रिखंडात्मक चरित्र ग्रंथ लिहिल्याची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली.

डॉक्युमेंट्री आणि पर्यटन माहिती केंद्र उभारणार:

‘माणूसकी फौंडेशन’चे अध्यक्ष प्रसाद मालपेकर यांनी आगामी उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, “बाळशास्त्रींच्या स्मृती जपण्यासाठी आणि ही चळवळ पुढे नेण्यासाठी आगामी काळात एक विशेष पुस्तिका आणि माहितीपट (डॉक्युमेंट्री) तयार करण्यात येणार आहे.” तसेच, या ठिकाणी अभ्यासक आणि पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन माहिती केंद्र उभारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

प्रा. बाजीराव जांभेकर यांनीही बाळशास्त्रींच्या विचारांची चळवळ पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाळशास्त्रींच्या अर्धपुतळ्यास प्रसाद मालपेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संस्थेचे विश्वस्त अमर शेंडे यांनी केले, तर आभार रोहित वाकडे यांनी मानले.

या प्रसंगी विश्वस्त सौ. अलका बेडकिहाळ, गजानन पारखे, भारद्वाज बेडकिहाळ, सौ. नीलम वाकडे, सौ. नुपूर बेडकिहाळ, श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे संजय चोरमले, कृष्णात बोबडे, चित्रकार राहुल परब, यामेश खवणेकर यांच्यासह पोंभुर्ले ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!