कर्नाटक निवडणुकीनंतर राजकीय हालचालींना वेग; दिल्लीत आदित्य ठाकरेंनी घेतली CM केजरीवालांची भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १४ मे २०२३ । मुंबई । काल कर्नाटक विधानसभा निवडणूक पार पडली. यानंतर दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे  आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात रविवारी (14 मे) सकाळी दिल्लीत झालेल्या भेटीनंतर चर्चेला उधाण आले आहे.

या भेटीची माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन दिली. ट्विटरवर भेटीचे फोटो शेअर करत आदित्य ठाकरे म्हणाले, ”आज सकाळी मी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी खासदार डॉ. प्रियंका चतुर्वेदी आणि आपचे खासदार संजय सिंह उपस्थित होते. यावेळी आमच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. देशातील लोकशाही आणि आपली राज्यघटना धोक्यात आहे आणि आपण तिचे सर्व प्रकारे संरक्षण केले पाहिजे.” ही बैठक सुमारे तासभर चालली. लोकसभा निवडणुकीसाठी 2024 हे वर्ष खूप खास आहे आणि त्यासाठी सर्व पक्ष एकजुटीने रणनीती आखण्यात गुंतले आहेत.

परिणीती चोप्राच्या साखरपुड्यात हजेरी

शनिवारी संध्याकाळी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप खासदार राघव चढ्ढा यांच्या एंगेजमेंट पार्टीमध्ये आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. तिथे त्यांच्यासोबत शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदीही उपस्थित होत्या. एंगेजमेंट पार्टीत अरविंद केजरीवाल त्यांच्या कुटुंबासह उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य ठाकरे अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचले.

विरोधी एकजुटीचे प्रयत्न सुरू
गेल्या काही काळापासून विरोधक एकजूट होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. केजरीवाल आणि आदित्य ठाकरे यांची भेट अशा वेळी झाली आहे, जेव्हा एक दिवस आधी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दणदणीत विजय मिळाला आहे. कर्नाटकातील या विजयानंतर विरोधकांचे मनोबल उंचावले आहे. पीएम मोदींचा पराभव होऊ शकतो, असा आत्मविश्वास त्यांच्यात आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर विरोधकांच्या एकजुटीची मोहीम तीव्र झाली आहे. या अनुषंगाने केजरीवाल आणि आदित्य ठाकरे यांची भेटीकडे पाहिले जात आहे.


Back to top button
Don`t copy text!