
थेट WhatsApp वर मिळवा
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतून पात्र गर्भवती महिलांना पहिल्या अपत्यासाठी ५ हजार रुपये आणि दुसऱ्या अपत्याला मुलगी असल्यास ६ हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा केली जात आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १९ ऑक्टोबर : महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि गरोदरपणात योग्य पोषण मिळावे यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील लाखो महिलांना थेट लाभ दिला जात असून, आर्थिक भार हलका होण्यास मोठी मदत होत आहे.
योजनेचे स्वरूप आणि निकष
या योजनेअंतर्गत पहिल्या अपत्यासाठी पात्र महिलांना एकूण ५ हजार रुपयांची मदत दोन टप्प्यांत दिली जाते. यामध्ये गर्भधारणेची नोंदणी आणि आरोग्य तपासणीनंतर पहिल्या टप्प्यात ३ हजार रुपये, तर बाळाच्या जन्मानंतर लसीकरण पूर्ण झाल्यावर उर्वरित २ हजार रुपये दिले जातात. तसेच, दुसरे अपत्य मुलगी असल्यास पात्र महिलांना ६ हजार रुपयांची आर्थिक मदत एकाच टप्प्यात दिली जाते.
अर्ज प्रक्रिया आणि पात्रता
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे वय किमान १९ वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच अटी व शर्तींनुसार वार्षिक उत्पन्न मर्यादा आणि इतर निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांना ऑनलाइन किंवा अंगणमीडी केंद्राच्या माध्यमातून यासाठी अर्ज करता येतो. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाते.





