
थेट WhatsApp वर मिळवा
पीएम किसान योजनेच्या २४ व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारकडून पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यावर प्रत्येकी २००० रुपये जमा केले जातात.
स्थैर्य, सातारा, दि. ०३ ऑक्टोबर : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना वर्षाला ६,००० रुपयांची आर्थिक मदत प्रत्येकी २,००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात दिली जाते. आगामी हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी (e-KYC) आणि आधार सीडिंगची प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही, हे तपासणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल किंवा ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण असेल, अशा शेतकऱ्यांचा हप्ता अडकू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले स्टेटस तातडीने तपासावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ई-केवायसी आणि स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरून (pmkisan.gov.in) सहजरीत्या स्टेटस तपासता येईल. संकेतस्थळावरील ‘Farmers Corner’ या विभागात जाऊन ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करावे. तेथे आपला नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून माहिती मिळवता येते. तसेच ‘Beneficiary List’ मध्ये जाऊन आपले राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडून यादीत नाव आहे की नाही हे पाहता येईल.
e-KYC पूर्ण करणे अनिवार्य
शेतकरी ‘Farmers Corner’ मधील ‘eKYC’ या पर्यायावर जाऊन ओटीपीद्वारे स्वतः मोबाईलवरून ई-केवायसी पूर्ण करू शकतात. याशिवाय जवळच्या नागरी सुविधा केंद्रात (CSC) जाऊन बायोमेट्रिक पद्धतीद्वारेही ही प्रक्रिया पूर्ण करता येते. ज्या शेतकऱ्यांची बँक खात्याशी आधार जोडणी आणि ई-केवायसी पूर्ण आहे, त्यांच्याच खात्यात २,००० रुपये थेट वर्ग केले जातील.



